मुक्तपीठ टीम
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALने आपलं कर्तृत्व दाखवून दिलं आहे. दिवाळीच्या आधीच गोड बातमी दिली आहे. HALने एचटीटी-४० हे स्वदेशी बनावटीचं प्रशिक्षण विमान तयार केलं आहे. त्यामुळे देश त्याबाबतीत आत्मनिर्भर होतानाच विदेशी चलन वाचण्याचा मोठा फायदाही होणार आहे. तसेच भारतात वैमानिक घडवणं सोपं जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानाचे नुकतेच अनावरण केले. या प्रसंगी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कसं आहे स्वदेशी प्रशिक्षण विमान?
- एचटीटी-४० या विमानाची संकल्पना आणि विकसन एचएएल अर्थात हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने केले आहे.
- या विमानात अत्याधुनिक वर्तमानकालीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.
- हे विमान वैमानिक-स्नेही असेल अशा रीतीने तयार करण्यात आले आहे.
- या विमानाच्या रचनेत कंपनीने तयार केलेल्या ६०% भागांचा वापर तसेच काही प्रमाणात खासगी क्षेत्राच्या समन्वयातून निर्माण भागांचा वापर केला आहे.
- हे विमान म्हणजे ‘आत्मनिर्भर भारता’च्या संकल्पनेचे झळाळते उदाहरण आहे.
स्वदेशी प्रशिक्षण विमानाचा उपयोग…
- एचटीटी-४० हे विमान मुलभूत विमान चालन प्रशिक्षण, हवाई कसरती, विशिष्ट साधनांसह उड्डाण आणि क्लोज फॉर्मेशन उड्डाणांसाठी वापरण्यात येणार आहे.
- तसेच दिशादर्शन आणि रात्रीच्या वेळेतील उड्डाण करण्यासाठी दुय्यम वापराकरिता या विमानाचा उपयोग केला जाईल.
- भारतीय संरक्षण दलांच्या प्रशिक्षणविषयक प्राथमिक गरजा भागविण्याच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विमानाची रचना करण्यात आली आहे.
HALच्या एचटीटी-४० विमानाची विलक्षण वैशिष्ट्ये
- या विमानात अत्यंत दक्षपणे तपासणी केलेले टर्बो-प्रॉप इंजिन आहे.
- या विमानामध्ये अत्याधुनिक हवाई तंत्रज्ञान, वातानुकुलीत कक्ष आणि इजेक्शन सीट्स बसविण्यात आल्या आहेत.
- चालत्या विमानात वैमानिकांची अदलाबदल, इंधन पुनर्भरण आणि अत्यंत कमी वेळात मागे फिरण्याची क्षमता अशी अत्यंत विलक्षण वैशिष्ट्ये या विमानात उपलब्ध आहेत.
- या विमानाच्या पहिल्या उड्डाणापासून सहा वर्षांच्या विक्रमी वेळेत प्रमाणीकरणासाठी आवश्यक सर्व चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
- एचटीटी-४० या विमानाने सर्व यंत्रणाविषयक चाचण्या, सर्व प्रकारची पीएसक्यूआर कामगिरी, गरम हवामान, समुद्र पातळी तसेच क्रॉस विंड चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
- पावसाच्या माऱ्याला देखील सहन करण्याची विमानाची क्षमता सिद्ध झाली आहे.
- सैनिकी हवाई उड्डाण योग्यता आणि प्रमाणीकरण केंद्राकडून (CEMILAC). या विमानाला परिचालनासाठी प्राथमिक परवानगी मिळाली आहे.