मुक्तपीठ टीम
चालू आर्थिक वर्षात भारतातील व्यापारी मालाची निर्यात ४१८ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्यावर पोहोचली आहे. हा आकडा नॉन-ईडीआय पोर्टस आकडे वगळून आहे. ते आकडेही धरले तर निर्यात ४१८ अब्ज डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे, जो भारताच्या निर्यात इतिहासातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. या कामगिरीविषयी भाष्य करताना वाणिज्य मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत खरोखरच ‘लोकल ते ग्लोबल’ झाला आहे.
भारताने मार्च २०२२ मध्ये ४०.३८ अब्ज अमेरिकन डॉलर्स व्यापारी निर्यातीचे सर्वोच्च मासिक मूल्य गाठले आहे, मार्च २०२१ च्या ३५.२६ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत त्यात १४.५३% ची वाढ झाली आहे आणि मार्च २०२० च्या २१.४९ बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत त्यात ८७.८९% ची वाढ झाली आहे.
एप्रिल २०२१-मार्च २०२२ या कालावधीत बिगर-पेट्रोलियम वस्तूंच्या निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यात एप्रिल २०२१ ते मार्च 2022मध्ये 32.62% ची वाढ झाली आणि ती ३५२.७६ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती,जी एप्रिल २०२०-मार्च २०२१ मध्ये २६६.०० अब्ज अमेरिकन डॉलर्स (USD)इतकी होती. तर एप्रिल २०१९ ते मार्च २० मधे ती २७२.०७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती आणि त्या तुलनेत २९.६६ % ची वाढ झाली होती.
वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारत खरोखरच ‘लोकल ते ग्लोबल’ झाला आहे.
या प्रगतीचा लाभ प्रत्येक भारतीयाला मिळावा हे,सुनिश्चित करत असताना भारत ज्या वेगाने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करत आहे ;त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे, असे श्री गोयल म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत हे नेत्रदीपक लक्ष्य साध्य करू शकला आहे.
भारताची अर्थव्यवस्था अनेक विक्रम पार करण्याच्या तयारीत असल्याचा विश्वास व्यक्त करून श्री गोयल म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारतासमोर उदात्त उद्दिष्टे ठेवली आहेत आणि आपले राष्ट्र अशी विशाल उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अत्यंत सक्षम आहे. अशक्य ते शक्य करण्यासाठी अथक प्रयत्न करा आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्न करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोयल म्हणाले की, आमच्या निर्यातदारांची ‘कधीही हार मानू नका’ (‘नेव्हर से डाय’)ही भावना, आपले निर्यातदार,ईपीसी आणि इंडस्ट्री असोसिएशन यांचे अथक प्रयत्न, भारत सरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकारांमधील समन्वय यात ‘संपूर्ण शासन हा दृष्टीकोन’ प्रतिबिंबित होत आहे.
अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक शेतकरी, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक एमएसएमई यांनी आणि राज्य सरकारांनी मिळून हे लाभदायी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र काम केले आहे, असे त्यांनी सांगितले. २०२१-२२ मधील भारताचा वैविध्यपूर्ण निर्यात पोर्टफोलिओ भारताच्या उत्पादन क्षमता तसेच उच्च प्रतीच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी उत्पादनांमध्ये वाढ दर्शवतो.