मुक्तपीठ टीम
मुंबईत पन्नास वर्षे वयाच्या एका दक्षिण आफ्रिकन महिलेच्या प्राथमिक तपासणीत एक्स ई हा नवा व्हेरियंट आढळला आहे. ही महिला दक्षिण आफ्रिकेतून भारतात दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी आली.
दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आलेल्या प्रयोगशाळा तपासणीत ही व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यानंतर सदर नमुना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवण्यात आला. या प्राथमिक तपासणीत तो एक्स ई व्हेरीयंट असल्याचे आढळले. त्यानंतर GISAID च्या तपासणीत देखील सदर व्हेरियंट एक्स ई असल्याचे आढळले असले तरी या नवीन व्हेरियंटची नि:संशय खात्री करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळेत या नमुन्याचे पुन्हा एकदा क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या ही महिला रुग्ण पूर्णपणे लक्षणविरहित असून पुन्हा केलेल्या प्रयोगशाळा तपासणीत ती कोरोना निगेटिव्ह आढळली आहे. एक्स ई हा व्हेरीयंट बी ए. १ आणि बी ए.२ चे मिश्रण असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढतो असे आतापर्यंतच्या माहिती वरून दिसते.
घाबरु नका, काळजी घ्या!
विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये बदल होत राहणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून यामुळे सर्वसामान्य जनतेने घाबरून न जाता आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे.