मुक्तपीठ टीम
भारतात तयार केलेल्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीला आता जगातील तीन देशांनी मान्यता दिली आहे. भारत आणि झिंबाब्वेनंतर नेपाळमध्ये आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेकच्या या लसीच्या शेवटच्या टप्प्यात २६ हजार लोकांवर चाचणी करण्यात आली असून ८१ टक्के लस प्रभावी ठरली होती.
नेपाळच्या औषध प्रशासन विभागाच्या अधिकृत “आपत्कालीन वापरासाठी को-वॅक्सिन या भारतीय लसीला मान्यता देण्यात आली आहे”. नेपाळला आतापर्यंत भारताकडून सीरमच्या अॅस्ट्रॅजेनेकाचे २३ लाख डोस मिळाले आहेत. यातील १० लाख डोस भारताने नेपाळला भेट म्हणून दिले होते.
चीनही देणार ८ लाख डोस
चीनने ही कोरोना प्रतिबंधक लसीचे ८ लाख डोस नेपाळला देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र हे डोस कधी दिले जाणार याविषयी चीनने अजून कोणतेही विधान केलेले नाही.
नेपाळमध्ये लसीची टंचाई
नेपाळने अशावेळी या लसीला मान्यता दिली आहे, जेव्हा नेपाळमधील कोरोना लसीचा साठा संपुष्टात आला असून लसीकरण बंद करण्यात आले आहे. जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी १६ लाख डोस प्राप्त झाले होते. तर आता देशाकडे पुरेसा लसीचा साठा नाही आहे.
४० देशांकडून को-वॅक्सिनबद्दल चौकशी
भारत बायोटेकने म्हटले आहे की, ४० देशांनी भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल चौकशी केली आहे. तर ब्राझील, फिलिपिन्स आणि थायलंडमध्ये ही लस मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत.