मुक्तपीठ टीम
लम्पी त्वचा रोग रोखण्यासाठी आता शास्त्रज्ञांनी रामबाण उपाय शोधला आहे. एका वर्षात एक-दोन रुपयांत उपलब्ध होणारी Lumpy Pro-Vac IND लस शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. ही 100% सुरक्षित लस असेल. अवघ्या एका वर्षात स्वदेशी लस तयार करणाऱ्या हरियाणातील हिसार येथील डॉ.नवीन कुमार आणि डॉ.संजय या दोन शास्त्रज्ञांनी हा दावा केला आहे.
हरियाणातील हिसार येथील नॅशनल इक्वीन रिसर्च सेंटरचे शास्त्रज्ञ डॉ. नवीन कुमार यांनी सांगितले की, २०१९ मध्ये हा आजार पहिल्यांदाच ओडिशामध्ये आढळला होता. त्याचा विषाणू पहिल्या तीन महिन्यांत ओळखला गेला. त्याची क्लिनिकल चाचणी तीन महिने चालली. ज्यामध्ये सशावर पहिली चाचणी करण्यात आली. दुसरी चाचणी मे २०२२ मध्ये १५ वासरांवर घेण्यात आली. ज्यामध्ये १५ बछडे पूर्णपणे सुरक्षित होते. यानंतर राजस्थानमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्यात आली. लसीकरणानंतर ७0 ते १४ दिवसांनी अँटीबॉडीज तयार होऊ लागतात.
चार आठवड्यांत प्राणी पूर्णपणे बरे होतात. यासाठी ५० चाचण्या करण्यात आल्याचे डॉ. डीआर गुलाटी यांनी सांगितले. एका चाचणीला आठवडा लागतो. लसीचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी एक वर्ष लागले. केंद्राचे संचालक डॉ.यशपाल म्हणाले की, आमच्या टीमने अतिशय कमी वेळात ही लस तयार केली आहे. या लसीच्या तातडीच्या वापरासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे. केंद्र सरकारने बुधवारी ही लस बाजारात आणली आहे. यापूर्वी नॅशनल इक्वीन रिसर्च सेंटरच्या शास्त्रज्ञांनी प्राण्यांसाठी कोरोना लस शोधून काढली होती.