मुक्तपीठ टीम
भाजपा माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अनेक आखाती देशांनी आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी पाकिस्तानातून आसाममधील ऑनलाइन न्यूज चॅनल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डिजिटल न्यूज चॅनल ‘TIME8’ च्या थेट प्रक्षेपणादरम्यान पाकिस्तानचा ध्वज दिसला. तसेच पैगंबर मोहम्मदांसंबंधित गाणे सुरू झाले आणि ‘पवित्र पैगंबरांचा आदर करा’ असे टीकर चालू लागले. ‘रिव्होल्यूशन पीके’ या पाकिस्तानी हॅकिंग ग्रुपने टाइम 8 वृत्तवाहिनीचे यूट्यूब अकाउंट हॅक केल्याचा आरोप आहे.
७० लाखाहून अधिक फॉलोअर्स असलेले हे आसामचे डिजिटल न्यूज नेटवर्क आहे. याला दर महिन्याला सरासरी ६० कोटी व्ह्यूज मिळतात. ९ जून रोजी लाइव्ह स्ट्रिमिंग दरम्यान त्याचे प्रसारण खंडित झाले होते. टाईम 8 डिजिटल न्यूज नेटवर्कचे व्यवस्थापकीय संपादक उत्पल कांत म्हणाले, “पाकिस्तान हॅकर ग्रुप रिव्होल्यूशन पीकेने टाइम 8 चे यूट्यूब चॅनल काही काळासाठी हॅक केले आणि यादरम्यान स्क्रीनवर पाकिस्तानी ध्वज दिसू लागला. टिकरवरही पैगंबरांचा आदर करा, असे चालू लागले. हा सायबर दहशतवाद असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. यामुळे देशाच्या सुरक्षेचाही खेळ होत असून सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करावी.
कांत म्हणाले, हॅकर्सना केवळ त्यांच्या धार्मिक भावना व्यक्त करायच्या नसून चॅनलची बदनामीही करायची होती असे दिसते. पाकिस्तानच्या लोकांनीही ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे. याबद्दल ते आनंद व्यक्त करत होते. अशी माहितीही टाइम8ने पोलिसांना दिली आहे.