मुक्तपीठ टीम
भारतात तवांग चकमकीबाबत चीनविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. भारताने चीनच्या कुरापतखोरीविरोधात जोरदार निषेध नोंदवला आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधातील काँग्रेस आणि अन्य पक्ष चीनविरोधात एकजुटीने बोलत असले तरी त्यांच्यातही आकोप प्रत्यारोप सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेेल्या यांगत्से भागाविषयी जाणून घेतानाच भारत चीन तणावाचा इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न…
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. चिनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. पण एलएसीवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी त्यांचा पाठलाग केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चिनीचे ३००हून अधिक सैनिक एलएसीवरील वादग्रस्त भागात घुसले होते. भारतीय लष्कराच्या जवानांनी पीएलएला चोख प्रत्युत्तर देत त्यांचा पाठलाग केला. या चकमकीत भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत.
अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवायची योजना आहे, ब्रह्मपुत्रेच्या आत बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सीमा भागात होत असलेल्या विकासाची चीनला चिंता आहे. भारताच्या सीमाभागाचा विकास चीनला आवडत नाही. असे अनेक प्रकल्प सुरू आहेत.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पुन्हा का वाढला तणाव ?
भारताची चीनशी ३ हजार ४८८ किमी लांबीची सीमा आहे. पूर्वेकडील चीनची सीमा १ हजार ३४६ किमी लांबीची आहे. यामध्ये अरुणाचल आणि सिक्कीमच्या सीमेचा समावेश आहे. अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे.
१९१४मध्ये ब्रिटीश सरकारने चीन आणि तिबेट यांच्यात शिमला करार केला. या करारात अरुणाचल हा भारताचा भाग असल्याचे नमूद करण्यात आले होते. जे स्वीकारण्यास चीनने नकार दिला. तेव्हापासून चीनच्या कारवाया अव्याहतपणे सुरू आहेत.
चीनला यांगत्सेमध्ये रस का आहे?
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील यांगत्से भागात यापूर्वीही भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आले आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्येही दोघांमध्ये वाद झाला होता. वास्तविक, चीनला यांगत्सेचे १७,००० फूट उंच शिखर काबीज करायचे आहे. हे शिखर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. ही उंची नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंच्या कमांडिंग पोझिशन मिळवून देते, ज्यामुळे सीमेच्या दोन्ही बाजूंवर लक्ष ठेवणे सोपे होते.
भारत-चीन संबंधातील तणाव…
- १९५९- भारताने दलाई लामांना दिलेलाआश्रय
- १९६२- भारत आणि चीनमध्ये युद्ध
- १९६७- भारतीय सैनिकांवर चीनचा हल्ला
- १९७५- भारत आणि चीन यांच्यात भीषण संघर्ष
- १९८७- तवांगच्या उत्तरेला तणाव
- २०१७- डोकलाममध्ये दोन्ही देशांचे सैनिक ७३ दिवस आमनेसामने
- २०२०- गलवानमध्ये हिंसक संघर्ष
- २०२२- चिनी सैनिकांचा तवांगमध्ये घुसखोरीचा अयशस्वी प्रयत्न