मुक्तपीठ टीम
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी निर्धारित वेळेत लोकलसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र तो पुरेसा नाही, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी यांनी व्यक्त केले आहे. सामान्यांच्या लोकल प्रवासासाठी निश्चित केलेल्या सकाळ आणि संध्याकाळच्या वेळा वाढवल्या जाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात संक्रमण वाढू नये यासाठी सरकारने तात्काळ मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी ही सेवा खुली करण्यात आली. कोरोनाचा धोका कमी होत असल्याचे समोर येताच महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी नसल्याने कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याचीच दखल घेत आता सकाळ आणि रात्रीचे काही तास सर्वांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
लोकल प्रवासादरम्यान गर्दी होऊ नये यासाठी पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत आणि ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत अशा वेळा निर्धारित करण्यात आल्या आहेत.
भाकपचे चिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी यांच्या मागणीनुसार, “या वेळात सुधारणा करुन सकाळी लोकल सुरू झाल्यापासून ७ ऐवजी ८:३० वाजेपर्यंत वेळ वाढवावी आणि संध्याकाळी सर्वांसाठी लोकल ९ ऐवजी ६ पासून सुरू ठेवावी. तर दुपारच्या वेळेत कुठलाही बदल करु नये.”
बसेस, मेट्रो, टॅक्सी, ओला, ऊबर ही वाहने दिवसभर सर्वांसाठी सुरु झाली असताना फक्त लोकल प्रवाशांसाठी बंधने का? लोकल सुरु नसल्याने बसमध्ये लोकलसारखीच गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे ७ फेब्रुवारीपर्यंत लोकलच्या वेळा सुधारणीच्या मागणीप्रमाणे बदलल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा भाकपचे चिटणीस कॉ. प्रकाश रेड्डी यांनी महाराष्ट्र सरकार, रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकारला दिला आहे.