मुक्तपीठ टीम
प्राप्तिकर विभागाने वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुरु केलेले धाडसत्र बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांचे धाबे दणाणून टाकणारे ठरले आहेत. विभागाच्या पुणे कार्यालय टीमने मीरा-भाईंदर परिसरातील एका बिल्डर समुहावर छापे घातले. त्या छाप्यांमध्ये ५२० कोटी ५६ लाखांचे बेहिशेबी उत्पन्न उघड झाले. तसेच बेनामी व्यवहारही झाल्याचे आढळले आहेत. अद्यापि या बिल्डर समुहाच्या लॉकर्सची तपासणी बाकी आहे. या समुहाने स्वयं मूल्यांकन कर भरून तडजोडीची तयारी दर्शवल्याचे कळते आहे. आता ‘तो’ बिल्डर आहे तरी कोण, अशी चर्चा सुरु झाली आहे.
प्राप्तिकर विभागाने १२ जानेवारीला ठाणे जिल्ह्यामधील मीरा- भाईंदरमध्ये प्रमुख बांधकाम व्यावसायिकांवर संबंधित प्रकरणी छापे घातले. यावेळी केलेल्या कारवाईत १० कोटी २६ लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच शोध मोहिमेदरम्यान जप्त केलेल्या रोख रकमेसहित यापूर्वीच्या वर्षांचे एकूण ५२० कोटी ५६ लाख रुपयांचे बेहिशोबी उत्पन्न आढळले. जमीन आणि सदनिकांच्या विक्रीद्वारे मिळालेले हे उत्पन्न होते. तसेच बनावट कंपन्यांच्या नावाने विनातारण अवैध कर्जांच्या, प्रारंभिक भांडवल/ कर्जाऊ रोख रक्कम, बेहिशोबी खर्चासाठी रोख रक्कम आदिंच्या स्वरुपात बेहिशोबी रोख रक्कम मिळाल्याच्या नोंदीही आढळल्या आहेत. त्याशिवाय २०१९-२०२० या आर्थिक वर्षात या समूहाने ५१४ कोटी ८४ लाख रुपयांचा बेहिशोबी विक्री महसूल प्राप्त केल्याचे देखील तपासादरम्यान आढळले. या शोध मोहिमे दरम्यान सापडलेल्या लॉकर्सची तपासणी अद्याप बाकी असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, आता या समूहाने उघड झालेल्या बेहिशेबी उत्पन्नासाठी स्वयं मूल्यांकन कर भरण्याची तयारी दर्शवली आहे. प्राप्तिकर खाते आता पुढे काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.