मुक्तपीठ टीम
“कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगमुळे प्रगत तंत्रज्ञान विकसित होत आहे. सुरक्षेसह जैवतंत्रज्ञान, संवाद माध्यमे आदी क्षेत्रात बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिकाधिक संशोधन व्हायला हवे. संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अतिशय महत्वपूर्ण ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, नवोपक्रम करण्याची वृत्ती रुजायला हवी,” असे मत डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे (आर अँड डीई) संचालक डॉ. पी. एम. कुरुलकर यांनी व्यक्त केले.
दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) माहिती तंत्रज्ञान विभाग आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन, कॉम्प्युटेशनल इंटेलिजन्स अँड लर्निंग’चे (एनसीसीसीआयएल) उद्घाटन डॉ. कुरुलकर यांच्या हस्ते झाले. परिषदेत निवड झालेले संशोधन प्रबंध द इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (आयईटीई), वेब ऑफ सायन्स ग्रुप आणि सीआरई प्रेस या संस्थांच्या जर्नलमध्ये प्रकाशित होणार आहेत.
‘एआयटी’च्या माणेक शॉ सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी वरिष्ठ शास्त्रज्ञ एम. एम. कुबेर, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर (नि.) अभय भट, सहसंचालक कर्नल (नि.) एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, परिषदेच्या समन्वयिका प्रा. डॉ. संगीता जाधव, प्रा. डॉ. अश्विनी सपकाळ आदी उपस्थित होते. ६४ संशोधन प्रबंधांच्या माध्यमातून १५० जणांनी या परिषदेत भाग घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिषद ऑनलाईन स्वरूपात होत आहे.
डॉ. पी. एम. कुरुलकर म्हणाले, “भारतीयांची बुद्धिमत्ता अपरिमित आहे. त्याला तंत्रज्ञानाची चांगली जोड मिळाली, तर अनेक अशक्यप्राय गोष्टी सहज साध्य होऊ शकतात. कोरोना महामारीच्या काळात भारतीयांनी केलेले प्रयत्न आणि विकसित झालेल्या तीन लसी हे त्याचेच द्योतक आहे. कोरोनावर तीन प्रभावी लस शोधणे आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे हे जगासाठी दिशादर्शक आहे. संपूर्ण जगातून भारताकडे आदरपूर्वक पाहिले जात आहे, ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे.” बदलती आव्हाने व तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार अभ्यासक्रमातही बदल होण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ. पराग कुलकर्णी (वरिष्ठ शास्त्रज्ञ), डॉ. यु. व्ही. कुलकर्णी, (वरिष्ठ प्राध्यापक), डॉ. सुजाता कुलकर्णी (सहयोगी प्राध्यापिका) यांचे बीजभाषण झाले. प्रा. डॉ. संगीता जाधव यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. ब्रिगेडियर (नि.) अभय भट यांनी आभार मानले.