मुक्तपीठ टीम
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे स्व. मदनभाऊ पाटील स्मृती मदनभाऊ महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आवाहन स्पर्धा सुकाणू समितीकडून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली. या पत्रकार परिषदेत आयुक्त सुनील पवार आणि कार्याध्यक्ष नगरसेवक संतोष पाटीलही उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यभरातील २५ दर्जेदार नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत.
यावेळी बोलताना आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार म्हणाले की, या एकांकिका स्पर्धा २४, २५, २६ सप्टेंबर २०२२ असे तीन दिवस चालणार आहेत. या स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे. प्रथम क्रमांकास रोख रुपये १ लाखाचे बक्षीस व मानाचा मदनभाऊ महाकरंडक व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रोख रुपये ५०,०००/- मदनभाऊ करंडक व प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रुपये २५,०००/- मदनभाऊ करंडक व प्रशस्तीपत्र अशी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धा बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १२८ नाट्यसंस्थांनी अधिकृत नोंदणी केली. त्यातून सुकाणू समितीकडून २५ दर्जेदार संस्थांची निवड करण्यात आली. यामधे कोल्हापूर, मुंबई, डोंबिवली, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, पुणे, कल्याण, रत्नागिरी, सांगली, मिरज आदि शहरांतून नाट्यसंस्था सहभागी होणार आहेत. या एकांकिका स्पर्धा सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत सादर होणार आहेत. यामध्ये निवडलेल्या नाट्यसंस्था या महाराष्ट्रातील नावाजलेल्या आहेत. नाट्यसंस्थांसाठी रहाण्याची व जेवणाची सोय महापालिकेकडून करण्यात आलेली आहे. तसेच एकवेळचा प्रवास खर्च देण्यात आलेला आहे.
गेली २ वर्षे कोरोना काळामुळे या स्पर्धा होवू शकल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी स्पर्धक संघामधे व
रसिकांच्यामधे या स्पर्धेविषयी उत्सुकता आहे. या एकांकिका स्पर्धा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेतील कला रसिकांसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे. त्यामुळे या वर्षीपासून आपल्या महानगरपालिका क्षेत्रातील जेष्ठ रंगकर्मी ज्यांनी नाट्यपंढरी सांगली नगरीचा लौकीक वाढवला व त्यांच्या रंगकार्याने नव्या पिढीसमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला अश्या जेष्ठ रंगर्मींना जेष्ठ रंगकर्मी पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.
या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालय, विद्यार्थी तसेच नाट्य रसिकांनी या एकांकिका स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदिन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, सुकाणू समिती सदस्य आणि नगरसेविका भारती दिगडे यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, अंजली भिडे, विशाल कुलकर्णी, मनपा ग्रंथालय विभागाचे राहुल मुळीक आदी उपस्थित होते.