क्रीडा थोडक्यात: १) कोरोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने जबरदस्त पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी केली. विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. दडपण वाढवत कॅलाडझिन्स्कायने ४ गुणांची कमाई केली. पण अखेर विनेश हिने १०-८ अशा फरकाने विजय मिळविला. २)भारतीय पुरुष हॉकी संघाने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत यजमान जर्मनीचा ६-१ असा धुव्वा उडवत जर्मनी हॉकी दौऱ्याची शानदार सुरुवात केली. निळकंठ शर्मा (१३व्या मिनिटाला), विवेक सागर प्रसाद (२७व्या आणि २८व्या मिनिटाला), ललित कुमार उपाध्याय (४१व्या मिनिटाला), आकाशदीप सिंग (४२व्या मिनिटाला) आणि हरमनप्रीत सिंग (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहेय. तर चार सामन्यांच्या मालिकेतील पहिला विजय भारताने मिळविला आहे. ३) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या १४व्या हंगामातील सामन्यांसाठी चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळूरु आणि दिल्ली अशा पाच शहरांची निवड केली होती. परंतु महाराष्ट्र शासनाने प्रेक्षकांविना सामन्यांना शनिवारी परवानगी दिल्यामुळे या यादीत मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे. हैदराबाद, चंडीगड आणि जयपूरला सामने होणार नसल्यामुळे अनुक्रमे सनरायजर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांना घरच्या मैदानात खेळण्याची संधी मिळणार नाही आहे. ४) इंग्लंड विरोधातील अहमदाबादमध्ये कमी धावसंख्येच्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा याने आयसीसीकडून जाहीर झालेल्या रॅकिंगमध्ये सहा स्थानांनी झेप घेतली आहे. तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६६ धावा केल्या, तर दुसर्या डावात नाबाद २५ धावा केल्या. त्यासोबतच आयसीसीने म्हटले आहे की, आता मालिका संपल्यावर रँकिंग जाहीर होण्याऐवजी मार्चपासून दर आठवड्याला रँकिंग जाहीर होणार आहे. ५) टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कसोटी सामना पार पडल्यानंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत वरूण चक्रवर्थीची पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा अपयशी ठरला असल्याचे सांगितले जात आहे.