जगदीश ओहोळ
आठ दिवसापूर्वी इलाहीनां फोन केला, उद्या येतोय भेटायला, तुमचे चाहते, आमचे पत्रकार मित्र श्रीकिशन काळे यांना सोबत घेऊन हे सांगायला.. पण बोलताना इलाहीना दम लागत होता, त्यांना जे बोलायचं ते बोलता येत नव्हतं. ‘मी आता..S S’ असे तुटक उच्चार कानी आले आणि तेव्हाच मन गलबलून गेलं.!
पुतण्याने फोन घेतला आणि “जगदीशजी इलाहीना आता सांगलीला आणलंय, त्यांची तब्बेत बरी नाही, पुन्हा पुण्याला आणले की सांगतो, मग या भेटायला..” आणि आज सकाळी समजलं गजलसम्राट इलाही जमादार आपल्याला सोडून गेले आहेत. आज रविवारी सकाळी १० वाजता त्यांनी आपल्या सांगली जिल्ह्यातील दुधगाव या मूळगावी अखेरचा श्वास घेतला. उद्या सोमवारी सकाळी त्यांच्यावर दूधगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
गझलेच्या क्षेत्रात त्यांचं जे योगदान आहे ते मराठी साहित्यविश्व कधीच विसरू शकणार नाही.
पुण्यात येरवड्या जवळ १०×१० च्या खोलीत इलाहीजी एकटेच राहायचे. त्यांचे शब्द, गजल आणि पुस्तके हेच त्यांचे विश्व होतं. सतत गजल गुणगुणत नवे शब्द जोडत राहायचे. आमचे मित्र मंगेश चिवटे यांच्या सोबत आम्ही २०१० साली पहिल्यांदा भेटलो. त्यांच्या घरी गेलं की इलाहीजी सहज सुरू व्हायचे गजल म्हणायला. आणि प्याल्यातला एकेक घोट रिचवत गजलेच्या विश्वात हरपून जायचे. इतर कोणताही विषय काढला तरी ‘झूट है सब’ असं म्हणत ‘आताच सकाळी केलेली ही नवी गजल ऐक’ असं म्हणत नव्या गजलेला आपल्या आवाजात न्याय द्यायचे. हा शेर बघा कसा आहे.. असे म्हणत नवनवीन शेर सादर करायचे.
एकदा मी माझं चारोळीचं पुस्तक त्यांना दाखवायला नेलं. त्यांनी ते वाचलं आणि बाजूला ठेवत म्हणाले, जमतील तुला शेर ही लिहायला.. जरा वेळ काढून येऊन बसत जा , मी सांगत जाईन!
पण इलाहीजी ते सारंच राहून गेलं!
जखमा अशा सुगंधी, झाल्यात काळजाला..
केलेत वार ज्यांनी, तो मोगरा असावा.!
या शब्दात जखमांना सुगंधित करणारे महान गझलकार आज सोडून गेलेत हे सहन होत नाही.
आपलं भेटायचं राहिलं इलाहीजी, मी ते औषध घेऊन येणार होतो.