मुक्तपीठ टीम
लष्कराचे प्रशिक्षणार्थी अधिकारी देशाच्या सुरक्षेसाठी एक आव्हान म्हणून उदयास येणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानासाठी सुसज्ज होणार आहेत. ते रोबोटिक्स, ड्रोन, मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर तंत्रज्ञानामध्ये पारंगत होऊन ऑपरेट आणि डिझाईन करण्यास शिकतील. त्यांना कुशल बनवण्याचं काम आयआयटीयन्स करणार आहेत. यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरच्या विद्यार्थ्यांची बॉडी युनिट ऑफ सायन्स एँड एज्युकेश्नल डेव्हलपमेंट (युनिसेड) आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी यांच्यात करार झाला आहे. हे प्रशिक्षण आयआयटी कानपूर, दिल्ली, गुवाहाटी, रुडकी इथल्या टीमकडून दिलं जाईल.
दहशतवादी अराजकता माजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. तसंच त्यांच्याकडून गेल्या काही काळात ड्रोनचा वापर कट कारस्थान आणि हल्ल्यांसाठी केला जात आहे. जम्मूच्या हवाई दल बेसवर ड्रोनने हल्ला करण्यात आला. हे पाहता लष्करात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारणाऱ्यांसाठी तयार होणाऱ्या तरुणांच्या विशेष प्रशिक्षणासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे. त्यांना ड्रोनचे ऑपरेशन, ओळख आणि कार्यप्रणालीची माहिती दिली जाईल. या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी रोबोटही तयार केले जातील. हे मेटल डिटेक्टरसारखे काम करेल आणि लँडमाईन्स आणि इतर प्रकारचे बॉम्ब शोधण्यास मदत करेल. यासाठी रोबोटिक्स आणि ड्रोनसाठी एक अत्याधुनिक लॅब इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये विकसीत केली जाईल.
आपत्तीच्यावेळी मदत कार्यात रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. हे आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेऊन लष्कराचे भावी अधिकारी त्यांच्या गरजेनुसार रोबोट बनवू शकतील. आयआयटी तज्ज्ञ त्यांना पूर्ण प्रशिक्षण देतील. मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून देखील अग्निशमन क्षमता वाढवली जाऊ शकते.
युनिसेडचे मुख्य मार्गदर्शक अवनिश त्रिपाठी यांच्या मते, भारतीय सैन्य अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी रोबोट आणि ड्रोनशी संबंधित तंत्रज्ञान विकसीत करण्यास सक्षम असतील. त्यांच्या सहकार्यासाठी अनेक सरकारी आणि खासगी संस्था बांधल्या जातील. प्रशिक्षणार्थी त्यांच्या गरजेनुसार पाळत ठेवू शकतील आणि प्रोटोटाईप विकसीत करू शकतील.
युनिसेड ही आयआयटी माजी विद्यार्थी संघटना आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे याची नोंदणी आहे. ही केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अविष्कार अभियानाअंतर्गत अनेक आयआयटीच्या समन्वयाने काम करते. याद्वारे ती संशोधनासह तांत्रिक प्रशिक्षण मोहिमा आयोजित करते. या संस्थेमध्ये ९ सदस्य आहेत. लष्कराच्या भावी अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यासंदर्भात वेबिनारवर चर्चाही झाली आहे.