मुक्तपीठ टीम
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटीने एक सर्वात स्वस्त प्रवासाची सोय करणारी ई-स्कुटर बनवली आहे. आयआयटी दिल्लीच्या इनक्युबेटेड स्टार्टअप, गॅलियोज मोबिलिटीने होप या नावाने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. या स्कूटरने फक्त २० पैसे प्रति किलोमीटर खर्च करून प्रवास करता येईल. ‘होप’ ही स्कूटर स्थानिक प्रवासासाठी कमी खर्चाची प्रदूषणमुक्त स्कूटर आहे. ती २५ किमीचा टॉप स्पीड देते. यासह, ती ई-वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या डिस्काउंट प्रकारातही येते. ड्रायव्हिंग लाइसन्स किंवा वाहन चालविण्यासाठी नोंदणीची आवश्यकता नसते.
‘होप’ ई-स्कुटरची गोष्टच भारी
• ‘होप’ ही स्कूटर पोर्टेबल चार्जर आणि पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरीसह येते.
• ही बॅटरी घरी वापरल्या जाणार्या सामान्य सॉकेटमध्ये पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.
• ही बॅटरी ४ तासात पूर्णपणे चार्ज केली जाते.
• ग्राहकांना ५० किमी आणि ७५ किमी बॅटरी क्षमतेच्या दोन रेंज निवडण्याचा पर्याय आहे.
• आयआयटी दिल्लीने सांगितले की, ही स्कूटर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, डेटा मॉनिटरिंग सिस्टम आणि पेडल-असिस्ट युनिट या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
• यात आयओटी असते जे डेटा विश्लेषकांद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्कूटरबद्दल नेहमी माहिती देते.
• अशा वैशिष्ट्यांमुळे, ‘होप’ भविष्यातील स्मार्ट आणि कनेक्ट स्कूटरच्या रेंजमध्ये येते.
गॅलिओस मोबिलिटी अशा काही कंपन्यांपैकी एक आहे जी, स्कूटरमध्ये असलेल्या पॅडल-असिस्ट सिस्टमसारखी विशेष वैशिष्ट्ये प्रदान करते. प्रवासादरम्यान ग्राहक त्यांच्या सोयीनुसार पेडल किंवा थ्रॉटलचा पर्याय निवडू शकतात. ‘होप’ मध्ये पार्किंगसाठी रिव्हर्स मोड तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही ठिकाणी स्कूटर पार्क केले जाऊ शकते. या स्कूटरची रचना आणि त्याच्या डिझाइनमुळे रहदारी असलेल्या ठिकाणी सहज जाण्याची क्षमता मिळते. गॅलिओस मोबिलिटी खाद्य, ई-कॉमर्स, किराणा वस्तू, आवश्यक वस्तू आणि इतर डिलिव्हरी कंपन्यांच्या स्थानिक पातळीवरही उपयोगी ठरत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत ऑन रोड सर्व्हिस पुरवणे आणि असलेली बॅटरी बदलणे यासारख्या तातडीच्या सेवा कंपनीद्वारे पुरविल्या जातील. गॅलिओस मोबिलिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य तिवारी आहेत. ‘होप’ ही एक स्वस्त मस्त प्रवासासाठीची महत्त्वाची पायरी आहे. ‘होप’ ची सुरूवातीची किंमत ४६,९९९ रुपये आहे, जी बाजारात सर्वात स्वस्त इंटरनेट कनेक्ट स्कूटर आहे.