मुक्तपीठ टीम
ठाणे जिल्ह्यातील सहाशेपेक्षा जास्त आशाताई रविवारी शेजारच्या पालघर जिल्ह्यात गेल्या. रविवारी आपल्या घरी थांबण्यापेक्षा त्या आपल्या पालघरमधील झडपोली गावातील भावाच्या भेटीला गेल्या. तिथं त्यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांना रक्षाबंधननिमित्त ओवाळत राखी बांधली. आपल्या समस्या त्यांच्या कानावर टाकल्या आणि त्यांच्या भाऊरायानेही त्यांच्या समस्या सोडवण्याचा शब्द देत दिलाशाची ओवाळणी दिली.
पालघर-ठाणे जिल्ह्यातील आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका, परिचारिका या सर्वांसाठी निलेश सांबरे उर्फ अप्पा म्हणजे केवळ नेते नसून सख्ख्या भावापेक्षाही जवळचे आहेत. दरवेळी दिवाळीत त्यांचा हा भाऊ भाऊबीजेला त्यांना पैठणी साडीची भेट देतो. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचा कृतज्ञतेची भाऊबीज हा उपक्रम हा आता पालघर-ठाणे जिल्ह्यांसाठी एक पारंपारिक सोहळाच झाला आहे. हजारो आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका, परिचारिका, महिला पोलीस यांच्यापर्यंत जिजाऊचे स्वयंसेवक पोहचतात. निलेश सांबरे आणि त्यांचे सुपुत्र धीरज निलेश सांबरेही अनेक केंद्रांवर जातात. घरच्या भाऊबीजेआधी या सर्व भगिनी आवर्जून आधी जिजाऊच्या भावाची भाऊबीज ओवाळणीसाठी जमतात. पैठणीची आपुलकीची भेट घेऊन त्या जिजाऊच्या कृतज्ञतेची भाऊबीज मनात जपत घरी परततात.
रक्षाबंधन सणासाठी त्याच बहिणी भाऊरायाला भेटण्यासाठी विक्रमगडच्या झडपोली गावातील जिजाऊ नगरीत जातात. रक्षाबंधनाच्या आधीचा सुट्टीचा दिवस त्यासाठी निवडलेला असतो. जिजाऊ नगरीत त्यांचा भाऊ निलेश सांबरे त्यांची वाट पाहत असतो. दिवसभरात अन्य सर्व खासगी, सामाजिकच नाही तर व्यावसायिक कार्यक्रमही ठेवलेले नसतात. दिवस फक्त आणि फक्त बहिणींसाठीचा असतो. शेकडो बहिणींसाठीचा!
या रविवारीही शहापूर तालुक्यातील सहाशेहून अधिक आशाताईनी झडपोली येथे निलेशजी भगवान सांबरे यांच्या घरी गेल्या. तिथं त्यांनी राखी बांधत, ओवाळत आपल्या समस्या भावासमोर मांडल्या. निलेश सांबरे यांनीही त्यांच्या शैलीत माहिती घेत, त्या कशा सोडवता येतील यावर विचार करुन त्यांना समस्या निवारणाचा शब्द दिला. त्या आशावर्करसाठी त्यांच्या भावाने दिलेला समस्या निवारणाचा शब्द हा लाखमोलाच्या ओवाळणीसारखा ठरला.
बहिणींकडून जिजाऊच्या उपक्रमांचीही माहिती
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे झडपोलीच्या जिजाऊ नगरीत १०० खाटांचे नि:शुल्क रुग्णालय, सीबीएसई शाळा, दृष्टीहीन दिव्यांगासाठी निवासी शाळा, यूपीएससी-एमपीएससी अकॅडमी, पोलीस प्रशिक्षण केंद्र हे आणि अन्य उपक्रम चालवले जातात. आपल्या भाऊरायाच्या भेटीनंतर आशावर्कर्सनी या उपक्रमांचीही माहिती घेतली. जे ऐकलं त्यापेक्षाही जास्त आमची जिजाऊ लोकांसाठी करते, आमचा भाऊ निलेश सांबरे, हे करतो, याबद्दल या भगिनींनी अभिमानाची भावना व्यक्त केली.