अपेक्षा सकपाळ
प्रत्येक फळ हे त्या त्या ऋतूनुसार खावे, असे वडिलधारे सांगतात. आयुर्वेदातही तसंच आहे, असं सांगितलं जातं. कारण त्यांचे त्या ऋतूत अधिक फायदे असतात. सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळा म्हटलं की, आंबे डोळ्यासमोर येतातच मात्र या उन्हाळ्यात आणखी एक असं फळ आहे जे चवीला शहाळ्यातील मलईप्रमाणे मधुर आहेच पण आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी आहे.
ताडगोळे कसे असतात?
- ऐकून का होईना आपल्याला नीरा हे सुमधुर पेय, तसंच त्याचाच ताडी हा मद्य प्रकार यामुळे ताडाचं झाड माहित असतंच.
- ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजे ताडगोळा.
- याचं शास्त्रीय नाव बोरासस फ्लॅबिलिफर असं आहे.
- इंग्रजी भाषेमध्ये ‘आईस अॅपल’ या नावाने ओळखले जाते.
- हे फळ भारतात महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.
- ताडाच्या झाडांची लागवड समुद्रकिनारी अधिक होते.
- ताडगोळ्यांना बंगालमध्ये याला ‘ताल’, तेलुगूत ‘ताती मुंजलू’, तमिळमध्ये ‘नुग्नू’तर हिंदीमध्ये ‘तारी’ या नावानं ओळखलं जातं.
काय आहे ताडगोळे?
- ताडगोळे हे फळ वर्षामध्ये ठराविक ऋतूमध्ये, म्हणजे उन्हाळ्यामध्ये उपलब्ध असणारे फळ आहे.
- पाच सात सेमी व्यासाचे हे छोटेसे फळ.
- वरती हिरवट – काळपट -मातकट रंगाची साल.
- ताडगोळे हे अतिशय मऊ आणि रसदार असतात.
- त्यांच्यावर जाड साल असतं.
- ही सालं काढणं सोपं नसतं.
- मात्र एकदा का साल काढली तर आत रसदार पांढरे गरे म्हणजेच ताडगोळे असतात.
- याची चव काहीशी शहाळ्यातील मलई प्रमाणे लागत असून, चवीला हे फळ मधुर असते.
- हे एक पाणीदार फळ असल्यामुळं ते कापायची गरज नसते.
उन्हाळ्यात ताडगोळे आरोग्यदायी!
- आरोग्याच्या दृष्टीनं उन्हाळ्यात थंडगार ताडगोळे खाणं उत्तम
- या फळाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास फळाचा आरोग्यासाठी फायदाच होतो. ताडगोळ्यांमध्ये
- खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व आढळतात.
- हे फळ तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याचं काम करतं.
- त्याचबरोबर फळामुळे शरीराचं तापमानही नियंत्रणात राहतं.
- उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकानं या फळाचं आवर्जून सेवन करावं.
- उष्णतेमुळं होणारी पोटातली जळजळ कमी होण्यात ताडगोळे मदत करतं.
- उन्हाळ्याच्या अनेकांना उन्हाळी लागते अशावेळी ताडगोळे खाल्ल्यास आराम मिळतो.
- ताडगोळे आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो.
- साल न काढता फ्रीजमध्ये ठेवल्यास ताडगोळे अनेक दिवस टिकतात.
- बाहेर उन्हात जाण्यापूर्वी हे फळ खावे. त्यामुळे उन्हाचा दाह कमी होतो.
ताडगोळ्यांचा त्वचेसाठीही फायदा-
- उन्हामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना अनेकदा त्वचेवर पुरळ येतात, अॅलर्जी होते अशावेशी ताडगोळ्यांचा रस त्वचेवर, पुरळांवर लावल्यास लवकर आराम मिळतो.
- ताडगोळ्यांपासून फेसपॅकही चांगला बनवता येतो. त्यासाठी चंदन उगाळून घ्यावं.
- त्यात थोडं नारळपाणी आणि ताडगोळा कुस्करून घालावा.
- याचा तयार झालेला फेस पॅक आपण चेहऱ्यावर लावावा.
- या फेसपॅकमुळं आपल्याला फ्रेश वाटेल आणि उन्हामुळं रापलेली त्वचा उजळेल.
अनेक व्याधींवर ताडगोळे उपयोगी
- किडनीच्या आरोग्यासाठी ताडगोळे अतिशय उपयुक्त असून शरीरातील नको असलेली द्रव्ये शरीराबाहेर फेकली जातात.
- ताडगोळे खाल्ल्यानं बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही.
- कांजण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळं कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते.
- ताडगोळ्यांमुळे शरीरातील साखरेची पातळी संतुलीत राहते.
- हे खाल्ल्यानं अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते.
वाचा:
ताडगोळे…वरून टणक आत सुमधुर शीतल! जाणून घ्या त्यांचा प्रवास…
पाहा व्हिडीओ: