मुक्तपीठ टीम
भारतात आता प्रवास करताना टोलसाठी फास्टॅग पाहिजेच पाहिजे. लोकांना दिलासा देण्यासाठी फास्टॅगच्या अंमलबजावणीची तारीख अनेक वेळा वाढविण्यात आली होती. मात्र आता तारीख आणखी पुढे वाढवणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व वाहनांवर फास्टॅगचे स्टिकर असणे आवश्यक झाले आहे. त्यामुळेच फास्टॅग नेमके काय आहे, ते समजवतानाच ते कसे मिळवावे याची माहिती देण्याचा मुक्तपीठचा प्रयत्न:
या वर्षाच्या सुरूवातीलाच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच एनएचआयने जाहीर केले की टोल नाक्यावर १ जानेवारी २०२१ पासून रोख रकमेद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे टोल स्वीकारण्यात येणार नाही. तथापि, ही अंतिम मुदत नंतर १५ फेब्रुवारी करण्यात आली. एनएचएआयने दिलेल्या माहितीनुसार, टोल देयकामध्ये फास्टॅगचा सध्या जवळपास ७५ ते ८० % भाग आहे. याचा अर्थ असा आहे की, प्रत्येक १०० वाहनांपैकी सुमारे ८० वाहने फास्टॅग वापरुन टोल भरतात.
एनएचएआय १५ फेब्रुवारीपासून टोलनाक्यावर १००% कॅशलेस टोलवसुलीचा प्रयत्न करीत आहे. या दिशेने पाऊल उचलण्यात वारंवार विलंब झाला आहे. परंतु आता तसे होणार नाही. त्यामुळेच फास्टॅग व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे:
काय आहे फास्टॅग?
- फास्टॅग हे स्टीकर आहे. त्यात रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडी चिप असते.
- टोल रस्त्यांवरील प्रत्येक मार्गिकेत टोल नाक्याजवळ एक स्कॅनर कॅमेरा लावलेला असतो. तो फास्टॅग स्टिकर स्कॅन करतो. त्यातून वाहनधारकाचे खाते आणि टोल कंपनी यांच्यात व्यवहार होतो.
- चिपला एक प्रीपेड खाते जोडलेले असते.
- त्या खात्यातून आपोआप टोलचे पैसे वळते होतात.
- त्यामुळे टोलची रक्कम अदा करण्यासाठी थांबण्याची गरज राहत नाही.
कसे मिळवायचे फास्टॅग
- आपल्या ओळखपत्रासह वाहन नोंदणीची कागदपत्रे घेऊन भारतात काही टोल नाक्यावर फास्टॅग खरेदी करता येते.
- फास्टॅग ऑनलाइनही मिळवता येते. ते तुम्ही www.amazon.in वर खरेदी करू शकता.
- फास्टॅग काही बँकांमधूनही उपलब्ध आहे.
- सध्या फास्टॅग उपलब्ध करून देणाऱ्या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक बँक, अॅक्सिस बँक तसेच पेटीएम पेमेंट्स बँक यांचा समावेश आहे.
- काही बँकांचे कर्मचारी फिरती वाहने घेऊनही टोल नाक्यांजवळ उभी असतात, त्यांच्याकडूनही खरेदी करता येते.