मुक्तपीठ टीम
मुंबई लोकलमध्ये होणारी गुन्हेगारी तशी नवी नाही. पण आता लॉकडाऊनमुळे लोकलमध्ये गर्दी नसल्याचा गैरफायदा घेत भरदिवसा लुटमारीची घटना घडली आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका मंत्रालय कर्मचाऱ्यावर चोरीच्या उद्देशाने चार जणांकडून हल्ला करण्यात आला. बुधवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तरीही न डगमगता एका चोराला पकडण्याची कामगिरीही प्रवासी विजय वाघधरे (५३) यांनी बजावली. या घटनेत एका महिलेसह आणखी दोन आरोपींचा शोध सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र, मुंबईच्या उपनगरीय लोकल सेवेत सामान्य प्रवाशांना प्रवासासाठी मज्जाव असताना हे चार लुटारू वाघधरेंच्या डब्यात पोहचलेच कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गर्दी नसल्याचा गैरफायदा
मंत्रालयात एका विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून काम करणाऱ्या विजय वाघधरे यांच्यावर हा हल्ला झाला. विजय वाघधरे हे करी रोडचे रहिवाशी आहेत. सकाळी मंत्रालयात जाण्यासाठी त्यांनी करी रोड स्थानकातून सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली. वाघधरे ज्या डब्यात होते, त्या डब्यात एक महिला व तीन पुरुष बसले होते. मशीद रोड स्थानक सोडल्यानंतर लोकल गाडीला सीएसएमटीजवळच सिग्नल मिळाला. लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे ट्रेनमध्ये विशेष गर्दी नव्हती. त्याच डब्यात बसलेल्या एका प्रवाशाने वाघधरेंना आधी जवळ येऊन वेळ विचारली. त्यानंतर मशिद बंदर रेल्वे स्टेशन गेल्यानंतर चौघांनी वाघधरेंकडे पाकिट आणि गळ्यातील सोन्याची चेन मागितली.
वाघधरेंची वाघासारखी हिंमत
त्यांनी प्रतिकार केल्यावर चौघांनी मारहाण सुरु केली. वाघधरेंनी आरडाओरड सुरु केला. तेव्हा सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमधील प्रवाशांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. परंतु त्यांनाही मदत करणं शक्य झालं नाही. अखेर लोकल स्टेशनला पोहोचली. त्यावेळी सोन्याची चेन व पाकिटातील पाच हजार रुपये घेऊन महिला व दोघे जण उतरून पसार झाले. परंतु वाघधरेंनी बहादूरी दाखवत एका चोराला पकडण्याची कामगिरीही बजावली.
मुक्तपीठचे प्रश्न
- संबंधित घटनेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
- लॉकडाऊनमध्ये सामान्य प्रवाशांना मज्जाव, लुटारू लोकलमध्ये कसे पोहचले?
- सध्या लोकलमध्ये गर्दी नसते, किमान त्यावेळी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल यांची गस्त, काही डब्यांमध्ये उपस्थिती शक्य नाही का
- लोकलच्या डब्यांमधीली सीसीटीव्हींबद्दल खूप वेळा बोलले जाते, ते सर्वत्र प्रत्यक्षात कधी येणार?