डॉ. श्वेता बुदयाल
कोरोना ने साथीच्या रोगांच्या तज्ज्ञांना सतत व्यग्र ठेवले आहे, कारण या विषाणूच्या नवनव्या प्रजाती येतच आहेत व आजार बरा झाल्यानंतर त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. खरेतर या मूळ विषाणूनेच आपल्याला अनेकबाबतीत थक्क करून सोडले आहे. त्याच्याबद्दलच्या अशाच एका नव्या संशोधनामुळे तज्ज्ञांना चांगलेच चक्रावून टाकले आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये (पूर्वी थायरॉइडचा आजार नसलेल्या) सबअॅक्युट थायरॉयडायटिस, हा विषाणूबाधेमुळे किंवा विषाणूबाधेनंतर उद्भवणारा थायरॉयइड आजार विकसित होत असल्याचे आढळून आल्याचे द जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी अँड मेटॅबोलिझम या मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये असे नोंदवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा कल इतर देशांतही दिसून आला आहे आणि भारत त्याला अपवाद नाही. म्हणूनच कोविडची लागण झाल्यावर त्यातून बरे होत असताना रुग्णांनी पुढील काही लक्षणांवर नजर ठेवून असणे आवश्यक आहे. तसेच, थायरॉइडची पातळी वरखाली होणे ही सुद्धा कोविडचे निदान करण्यासाठी एक खुणेची गोष्ट ठरू शकते, आणि म्हणूनच फिजिशियन्सनी या नव्याने उद्भवलेल्या चिकित्सात्मक घडामोडीच्या शक्यतेबद्दल सजग असायला हवे.
सबअॅक्युट थायरॉयडायटिस किंवा पोस्ट व्हायरल थायरॉयडायटिस म्हणजे काय? सबअॅक्युट थायरॉइडायडिसमध्ये थायरॉइड ग्रंथींना सूज येते. श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला संसर्ग झाल्यानंतर उद्भवणारी ही स्थिती आहे थायरॉइड ग्रंथींना विषाणूसंसर्ग झाल्याने निर्माण होणारी समस्या तशी सर्रास आढळून येत नाही. गालगुंडांसाठी कारणीभूत ठरणारा विषाणू, इन्फ्लुएन्झाचा विषाणू आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करणारे इतर विषाणू सबअॅक्युट थायरॉइडायटिससाठी कारणीभूत ठरत असल्याचे आढळून आले आहे.
कारणे आणि धोके: सबअॅक्युट थायरॉइडायटिसचे सर्वात ठळक वैशिष्ट्य म्हणजे – थायरॉइड ग्रंथींमध्ये हळूहळू किंवा अचानक जाणवणारी वेदना. थायरॉइड ग्रंथींना येणारी वेदनादायक सूज अनेक आठवडे किंवा महिने तशीच राहू शकते. थायरॉइड ग्रंथींमधील स्त्राव अतिरिक्त प्रमाणात स्त्रवत असल्याची (हायपरथायरॉइडिझम) लक्षणे, उदा. चिंताग्रस्तता, हृदयाचे ठोके जलद गतीने पडणे आणि उष्णता सहन न होणे ही या आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत. नंतर थायरॉइड ग्रंथीमधील स्त्राव अतिशय कमी प्रमाणात स्त्रवत असल्याची (हायपोथायरॉइडिझम) थकवा, बद्धकोष्ठता किंवा गारवा सहन न होणे अशाप्रकारची लक्षणे दिसून येऊ लागतात. काही काळाने या ग्रंथींचे कार्य पूर्ववत होते. पण तरीही ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी.
अशा अनेक संभाव्य परिघीय आणि केंद्रीय यंत्रणा आहेत, ज्यांच्या माध्यमातून कोरोना चा संसर्ग सबअॅक्युट थायरॉइडायटिससाठी कारणीभूत ठरू शकतो. हे बहुतांशवेळा नजिकच्या काळात श्वसनमार्गाला विषाणू संसर्ग झाल्याच्या लक्षणांना सामो-या गेलेल्या मध्यमवयीन महिलांच्या बाबतीत घडते. हा स्वत:हूनच आटोक्यात येणारा आजार असून त्याचे तीन विशिष्ट टप्पे आहेत – सुरुवातीच्या थायरोटॉक्सिक टप्प्यानंतर हायपोथायरॉइडिझमची स्थिती उद्भवते व त्यानंतर पुढील काही आठवडे ते काही महिन्यांपर्यंतच्या काळामध्ये थायरॉइड ग्रंथींचे कार्य पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरू राहते.
थायरॉइडवरील विषाणूची लक्षणे
-
गळा दुखणे
-
थायरॉइड ग्रंथीच्या ठिकाणी हलकेच दाब दिल्यास तिथे हळवेपणा जाणवतो (पल्पेशन)
-
ताप
-
थकवा आणि अशक्तपणा
-
चिंताग्रस्तता
-
उष्णता सहन न होणे
-
वजन कमी होणे
-
घाम येणे
-
अतिसार
-
कंप
-
छातीची धडधड वाढणे
मात्र यातील चांगली गोष्ट म्हणजे, वेळच्यावेळी निदान झाल्यास कोरोना मुळे उद्भवलेला सबअॅक्युट थायरॉइडायटिस दाहशामक औषधे आणि कोर्टिकोस्टेरॉइड उपचारांना चांगला प्रतिसाद देतो. असे असले तरीही, इथे एक गोष्ट आवर्जून नोंदवायला हवी, ती म्हणजे कोविड रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स किंवा अशा रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनी लवकरात लवकर या गोष्टीची नोंद केली पाहिजे. लवकरात लवकर झालेले निदान आणि वेळच्यावेळी घेतलेला दाहशामक औषधोपचार यांच्या आधारे या आजाराचे यशस्वी व्यवस्थापन शक्य आहे.
(डॉ. श्वेता बुदयाल या मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कन्सल्टन्ट एंडोक्रिनोलॉजिस्ट व डायबेटोलॉजिस्ट आहेत)