मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा कणा रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित “लोक-शास्त्र सावित्री” नाटकाचा प्रयोग १ डिसेंबर २०२१ रोजी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात, नाशिक येथे सायंकाळी ६.०० वाजता संपन्न झाला. निसर्गाच्या आव्हानात्मक परिस्थितीत म्हणजे धोधो कोसळणाऱ्या पावसातही नाशिककरांनी “लोक-शास्त्र सावित्रीचा प्रयोग हाऊसफुल्ल केला.
सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील पुण्यात १८४८ साली मुलींसाठी शाळा सुरू केली. हजारो वर्षांपासून मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली होती. फुले दाम्पत्याने त्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांना मोडीत काढले आणि इतकेच नाही तर वर्णवादाला पहिल्यांदा फुले दाम्पत्याने आव्हान दिले.
सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपण नेहमीच भरभरून बोलतो,परंतु हे नाटक सावित्रीला वर्तमानाशी जोडतं. ते आपल्याला स्वतःतील सावित्री शोधायला प्रेरित करतं. सावित्री म्हणजे विचार! प्रत्येक व्यक्तीच्या मनात सावित्री जागी होते पण व्यवहाराच्या प्रहाराने ती लोप पावते. प्रत्येकाच्या मनाततील सावित्रीला चिन्हीत करण्यासाठी हे नाटक पुढाकार घेते.
वर्णवाद , धर्मशास्त्र, ब्राह्मणवाद, जातीव्यवस्था, लिंगभेदावर आधारित सामाजिक व्यवस्थेला आव्हान देत ‘माणूस’ म्हणून जगण्याला त्यांनी प्रोत्साहन दिले. याच बिंदू वरून मंजुल यांचे नाटक आकार घेते. नाटक ‘माणूस’ असण्याचा हुंकार देते.
नाटकाची सुरुवात गाण्याने होते “वैदेही झाली, द्रौपदी झाली, झाशीची राणी झाली, परंतु आता मला सावित्री व्हायचे आहे.” माझ्यामध्ये बहिणाबाईला जागवायचे आहे. सावित्रीबाईला जागवायचे आहे. माझ्या मनात सावित्रीबाई जागृत झाली, तर मनातील सावित्रीबाई डगमगणार नाही, मी माणूस म्हणून जगेन. ‘मानवते’ चा एल्गार आहे “लोक-शास्त्र सावित्री” नाटक.ज्यामध्ये महिलांना ‘माणूस’ म्हणून जगायचे आहे. भारतीय संविधानाने त्यांना समानतेचा अधिकार दिला आहे. लिंग-आधारित भेदभाव केलेला नाही.
नाटकाचा मुख्य स्वर आक्रोशाचा आहे, निषेधाचा आहे. हा आक्रोश व निषेध पितृसत्तेच्या विरोधात आहे. ज्याने स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला. स्त्रीच्या मानवी रूपाचा उदय होऊ दिला नाही. स्त्री जीवनाची असहायता, सहनशीलता,शोषिकता,छळवणूक, पीडा प्रस्तुत झाली आहे. स्त्री शरीरात अवतार होताच, ती आई, बहीण, काकू, मावशी,मामी,आत्या, आजी, पत्नी,नणंद अशी विशेषणं मिळवते, परंतु त्यात स्त्रीचे “स्व” कुठे राहतं.
९० मिनिटांच्या या नाटकात तीन स्तरांतील (वर्गातील) महिला आहेत.
पहिली निम्न वर्गातील घरगुती कामगार महिला. सायली पावसकर हिने ती जबरदस्त वठवली आहे. तिने ‘घरोघरी’ झाडू, लादी, भांडी साफ करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवले आहे. पण त्या आर्थिक कमाईवर तिचा अधिकार नाही. घरी, तिचा नवरा दारू पिण्यासाठी तिला मारहाण करून तिची कमाई हिसकावून घेतो. नवरा तिला मारतो, ती देखील नवऱ्याला मारते. रात्री नवरा दारू पिऊन येतो व तिच्यावर प्रेम करतो. या महिलेला वाटतं – “काय झालं मारले तर प्रेम पण तर करतो ?” ती या पितृसत्ताक व्यवस्थेच्या नियंत्रणाला, मानसिकतेला समजत नाही.
दुसरी महिला मध्यमवर्गीय शिक्षिका आहे.कोमल खामकर यांनी मध्यमवर्गीय महिलेची भूमिका उत्तम साकारली. तिच्या चरित्रात एकीकडे शिक्षण, नोकरी, जीवन मूल्ये बदलण्याची परिस्थिती आहे आणि दुसरीकडे पारंपारिक संस्कार आहेत. तथाकथित पुरुष क्षेत्रामध्ये वेगाने तिचा वाटा तर वाढत गेला परंतु अर्थसत्ता असूनही पितृसत्ताक वर्चस्वामुळे निर्णय घेण्याच्या अधिकारापासून ती वंचित राहिली. स्वतःच्या मर्यादा तिला स्वतःला ओलांडाव्या लागणार , तिला विचार करावा लागणार, तेव्हाच ती स्वत: ला ‘मानवी’ रूपात स्थापित करू शकणार.
नाटकात, जन्माच्या वेळेपासूनच मुलांना आणि मुलींना शक्य तितके वेगळे कसे घडवले जाते त्याला ही दर्शवले आहे. मुलीला शिक्षण दिले नाही जात, कारण मुलगी म्हातारपणाचा आधार नाही. मुलगी म्हणजे परक्याचं धन. मुलांना भविष्यातील कुटूंब प्रमुख, कमावणारा , मालमत्तेचा मालक, व्यवस्थापक, राजकारण, धर्म, आणि व्यवसायात सक्रिय व्यक्ती म्हणून पाहिले जाते. दुसऱ्या बाजूला मुलीकडून अपेक्षा केली जाते की, तिने भविष्यात मुलांना जन्म द्यावा, त्यांचे संगोपन करावे, आजारी व वृद्धांची सेवा करावी.घरगुती सर्व कामे करावी. अशा पध्दतीने, पुरुष स्वामी होतो आणि स्त्री दासी बनते. याच विचारसरणी मुळे, पुरुषप्रधान समाजात, महिला शतकानुशतके दुय्यम दर्जाची नागरिक बनून राहिली आहे.सर्व मूल्ये, श्रद्धा, परंपरा, नाती आणि नातेसंबंध – स्त्रीने गप्प सहन करत राहिल्याने चालली आहेत.
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा न दिल्याचे दृश्य देखील या नाटकात दाखवले आहे.संविधानात, कायद्याने मुला इतकाच मुलीला वडिलांच्या मालमत्तेत अधिकार देण्यात आला आहे, परंतु आई स्वत: पितृसत्तावादी व्यवस्थेची वाहक बनते आणि मुलीला कागदावर स्वाक्षरी करुन वडिलांची मालमत्ता आपल्या भावाला देण्यास उद्युक्त करते. आपण बायकांना मालमत्तेची काय आवश्यकता आहे? आईचा हा विचार पारंपारिक पितृसत्ताक व्यवस्थेतून जन्माला आला आहे.
या नाटकाची तिसरी नायिका “अभिनेत्री” असून ती अश्विनी नांदेडकर यांनी अतिशय ओजस्वी स्वरूपात साकारली आहे. जी स्वतः स्वतंत्र आहे. ‘मानवी रूपात स्वतःचे अस्तित्व प्राप्त झालेली आहे. ती या दोन्ही स्त्रियांना समजावून सांगते की पितृसत्तात्मक व्यवस्था ही सामाजिक संरचना आणि चालीरितींची अशी एक प्रणाली आहे ज्या अंतर्गत पुरुष स्त्रियांवर आपले वर्चस्व, अत्याचार, शोषण आणि नियंत्रण ठेवतात.ती सांगते की महिलेला स्वचेतना जागृत करावी लागेल. स्वत: चे अस्तित्व शोधावे लागेल. तरच तिला ‘माणूस’ म्हणून स्वीकारले जाईल. महिलांना निर्भय, स्वावलंबी, सशक्त, अस्मिता, अस्तित्वाविषयी सजक आणि संवेदनशील राहायला हवे. यासाठी महिलांचे साक्षरता, शिक्षण आणि चैतन्य पसरवणे आवश्यक आहे जेणेकरुन सामाजिक, सांस्कृतिक बदल घडून येतील.स्त्रीचा आत्म-विकास आणि आत्मविश्वास जागृत करून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे उद्दीष्ट घेऊन ही ‘अभिनेत्री’ समोर येते. आपल्या आतल्या सावित्रीला जागृत करण्याचे आव्हान ती करते (म्हणजेच ‘माणूस’ म्हणून जगणे) . तरच आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग सापडेल. जो मार्ग लिंग समानतेवर आधारित असेल.
अभिनेत्री अभिव्यक्त होते की,मी स्त्री रुपात जन्माला आले तर काय झालं ? लिंग ही निसर्गाची देण आहे. लिंग बदलता येत नाही. मी जन्म देते तर काय झाले ? मी प्रकृती ला चालवणारी जननी आहे तर काय झाले? नराच्या किंवा मादीच्या शरीर रुपात जन्माला येण्याचा अर्थ असा नाही की आपला स्वभाव, आचरण, भूमिका, आपले भाग्यदेखील त्या आधारावर निश्चित करावे. अभिनेत्री द्वारे लैंगिक असमानतेवर बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत आणि उत्तर देखील शोधण्यात आले की, ही वैशिष्ट्ये असूनही समाजात स्त्रियांचा दर्जा दुय्यम का आहे? मी हे सगळं मानत नाही. मी ते नाकारते कारण मला ‘मनुष्य’ रूपात जगायचे आहे. मी ‘माणूस’ आहे.
नाटकाच्या शेवटी नाटकाचे सर्व कलाकार प्रियांका कांबळे, तुषार म्हस्के, नृपाली जोशी, सुरेखा साळुंखे आणि संध्या बाविस्कर,रूपवर्धिनी सस्ते,मोरेश्वर माने समूह स्वरूपात ताकदीने उदयास येतात. हा समूह भारतीय समाजातील आहे. ज्यात पुरुष आणि स्त्रिया दोघेही आहेत, जे लैंगिक समानतेबद्दल बोलतात. जे स्वत: मध्ये सावित्री जागवा असे आवाहन करतात. सावित्री सर्वांपर्यंत पोहोचली आहे. आता येथून आम्ही बाहेर पडू ते माणूस म्हणून जगण्यासाठीच.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या ‘थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे तत्व आहे की – “रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेचे संपूर्ण दर्शन आहे.” हे नाटक अंतला संवाद बोलता बोलता आपल्या सत्वात शिरते.
पशु पासून माणसाला वेगळं करते ती त्याची वैचारिक क्षमता. म्हणूनच “वैचारिक नाटक चालत नाही !” या भ्रमाला थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी गेले २९ वर्ष आपल्या विविध कलाकृतीतून खोडत आले आहेत. सातत्याने रंगभूमीवर विचारांचे नाटक प्रस्तुत करून प्रेक्षकांना माणूस म्हणून सृजित करणे आवश्यक आहे. इथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात “विचार करण्याची क्षमता माणसांना जनावरांपासून वेगळी करते. जी लोकं हे म्हणतात की वैचारिक नाटक चालत नाही ते प्रेक्षकांना काय समजतात ?” नाटक म्हणजे क्षणिक आनंद नाही तर आयुष्यभराची सात्विक ठेव आहे. माणसाला माणूस बनवते ती कला. कला जी प्रत्येक मानसिकता, सीमा तोडून मानवाला उंच भरारी देते.
नाटकाच्या शेवटी, लैंगिक समानतेची मागणी करते की, आपल्यातील प्रत्येकाने, स्त्रिया आणि पुरुषांनी स्वतःच्या अंतःकरणात पहावे. आपल्यातील नकारात्मक पुरुषोचित्त (नियंत्रण करणे, दबावपूर्ण वर्चस्व आणि आत्मकेंद्रीपणा) आणि स्त्रीत्व (झुकणे, भीती-व्यथित करणे, संकोच करणे) यासर्वातून वर उठावे..यासाठी, आपण सर्व मुले, मुली, पुरुष आणि स्त्रिया यांनी स्त्री आणि पुरुषांच्या सकारात्मक वैशिष्ट्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. आपल्यातील प्रत्येकाला बळकट आणि सहृदय, निर्भय आणि संवेदनशील, भावनिक आणि तर्कशील होणे आवश्यक आहे. सर्वांसाठी न्याय आणि शांततापूर्ण असे जग निर्माण करण्यासाठी, सर्वच महिला आणि पुरुषांना लैंगिक समानता मिळविण्यासाठी एकत्र काम करावे लागेल. सर्व पुरुष आणि स्त्रिया मानवी स्वरुपात जगू शकतात. सर्वांच्या आत सावित्रीबाई फुले जन्माला यावी !