मुक्तपीठ टीम
राज्यातील सत्ताधारी आघाडीतील नेते-कार्यकर्त्यांकडून टीका सहन करावे लागलेले गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आता पूर्ण अॅक्शन मोडवर आलेले दिसत आहेत. परिपक्वतेमुळे मी शांत असतो याचा अर्थ थंड नाही हे दाखवून देण्याचा चंगच जणू त्यांनी बांधल्याचे दिसत आहे, अशी चर्चा आहे. मनसेच्या ३ मेच्या मशिद भोंगे इशाऱ्यामुळे पोलीसही पूर्ण तयारीत असल्याचं बजावत त्यांनी कायदा-सुव्यवस्था बिघ़डवणं सहन केलं जाणार नसल्याचा इशाराच अप्रत्यक्षरीत्या दिला आहे. सगळ्या देशात एकाप्रकारे काही घटक अशांतता वातावरण निर्माण करत असून महाराष्ट्रातही प्रयत्न सुरु आहेत, असेही ते स्पष्टपण बोलले. तसेच ३ मे रोजी महाराष्ट्रात भलतं काही घडवलं जाईल या भीतीविषयी बोलताना त्यांनी थेट केंद्राच्या गळ्यात ती जबाबदारी मारली आहे. केंद्राच्या आयबी आणि रॉ या यंत्रणांकडून आपण माहिती मागणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.
भोंग्यांबाबत कडक धोरण
- सगळ्या देशात एकाप्रकारे काही घटक अशांतता माजवली जात असून महाराष्ट्रातही प्रयत्न सुरु आहेत.
- मशिदींवरील भोंग्यांवरून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भोंग्यांबाबत कडक धोरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
- भोंग्यांबाबत येत्या एक – दोन दिवसांत मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात येणार आहेत.
- पोलीस महासंचालक, आयुक्तांच्या स्तरावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत बोलू आणि नंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही दिलीप वळसे पाटील स्पष्ट केलं.
“परिस्थिती बिघडेल असं वाटत नाही. पण आम्हीदेखील पुर्ण तयारीत आहोत. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी काळजी घेत आहोत,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. “कोणत्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ, अशांतता निर्माण होत असेल तर अशी कोणतीही कृती कारवाईला पात्र ठरते. मग ती संघटना, व्यक्ती कोणीही असो. कारवाई केली जाईल,” असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिला.
केंद्रीय यंत्रणांकडून इनपुट मागणार!
- संपूर्ण देशात एकाप्रकारे काही घटक अशांतता वातावरण निर्माण करत आहेत.
- महाराष्ट्रातही प्रयत्न सुरु आहेत.
- पण महाराष्ट्र पोलीस पूर्ण तयारीत आहेत.
- अशांतता निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत.
- दंगलीचा कट असल्याची काही माहिती नाही.
- पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री तसंच आयबी, रॉ या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांशी बोलू आणि निर्णय घेऊ.