मुक्तपीठ टीम
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकरी चारीबाजूंनी नाडवला जात आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व शेतीला उद्ध्वस्त करणारे तीन काळे कृषी कायदे मोदी सरकारने आणले होते. या जुलमी कायद्यांविरोधात देशातील शेतकऱ्यांनी आवाज बुलंद करत दिल्लीला घेराव घालून ऐतिहासिक आंदोलन केले. मोदी सरकारला अखेर शेतकऱ्यांच्या आवाजासमोर झुकावे लागले व तीन काळे कायदे रद्द करावे लागले, या घटनेला आज एक वर्ष झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता तर ७३३ बळी टाळता आले असते असे राहुलजी गांधी यांनी म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेच्या आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजता गजानन दादा पाटील मार्केट यार्ड, शेगाव येथून झाली व भस्तान गावात पदयात्रेची सांगता झाली. यावेळी चौक सभेत शहिद शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना राहुलजी गांधी म्हणाले की, शेतकऱ्यांचा आवाज हा देशाचा आवाज आहे. तीन काळे कृषी कायदे अन्यायकारक होते म्हणूनच देशातील शेतकऱ्यांनी त्याला विरोध करत तीव्र आंदोलन केले. दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला पण मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. काही मोजक्या उद्योगपतींच्या हितासाठी मोदींनी काळे कृषी कायदे आणले होते. सरकारकडे पोलीस, शस्त्रे, प्रशासन सर्व काही होते पण शेतकऱ्यांकडे फक्त त्यांचा आवाज होता. सरकारच्या हटवादीपणामुळे ७३३ शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला, हे बळी टाळता आले असते. भारत जोडो यात्रेचा आजचा मुक्काम बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे आहे.