मुक्तपीठ टीम
होळीचा सण म्हणजे होलिका दहनानंतरची रंगांची उधळण ठरलेली. त्यामुळेच होळी सणाच्या निमित्तानं सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी सिडकोने एक नवं पाऊल उचललं आहे. सिडकोच्या ५७३० सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेत आता आणखी सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबईतील विविध नोडमधील अतिरिक्त सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता या योजनेच्या माध्यमातून एकूण ६ हजार ५०८ सदनिका विक्रीकरिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेऊन नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे.
सिडको महामंडळातर्फे २६ जानेवारी २०२२ रोजी ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये ५,७३० सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या सदनिकांव्यतिरिक्त नवी मुंबईच्या द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील काही अतिरिक्त सदनिका सदर योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
यामुळे सदर योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता द्रोणागिरी येथे १८१, घणसोली येथे १२, कळंबोली येथे ४८, खारघर येथे १२९ आणि तळोजा येथे १,५३५ अशा एकूण १,९०५ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता द्रोणागिरी येथील २४१, कळंबोली येथील २२, खारघर येथील 88 आणि तळोजा येथील ४,२५२, अशा एकूण ४,६०३ सदनिका उपलब्ध आहेत. याप्रमाणे, एकूण ६,५०८ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
योजनेतील अर्ज नोंदणी ते सोडत या दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून याकरिता www.lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज नोंदणी, कागदपत्रे सादर करणे आणि अनामत रकमेचा भरणा करावयाचा आहे. तथापि, अर्जदारांना ठिकाण (नोड) निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही. संगणकीय सोडत काढून वरीलपैकी कोणत्याही ठिकाणची सदनिका अर्जदारांना सिडकोकडून वाटपित करण्यात येईल. पहिली सोडत पार पडल्यानंतर अ.जा./अ.ज./भ.ज./वि.ज. या वैधानिक आरक्षित प्रवर्गातील सदनिका शिल्लक राहिल्यास त्वरित दुसरी सोडत काढण्यात येऊन या सदनिकांचे वाटप वैधानिक प्रवर्गांतील उर्वरित
पात्र अर्जदारांना करण्यात येईल. तर पत्रकार, दिव्यांग, माजी सैनिक, राज्य शासन कर्मचारी, नवी मुंबई प्रकल्पबाधित, माथाडी कामगार, धार्मिक अल्पसंख्य या प्रवर्गांकरिता आरक्षित सदनिका पहिल्या सोडतीनंतर शिल्लक राहिल्यास, दुसरी सोडत काढण्यात येऊन या सदनिकांचे वाटप या प्रवर्गांतील तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित पात्र अर्जदारांना करण्यात येईल.
गृहनिर्माण योजनेतील अन्य अटी व शर्ती कायम असून योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील, असे सिडकोकडून कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अतिरिक्त सदनिकांचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात आले आहे.