विनय जोशी
२०१९ च्या डिसेंबरमध्ये सीएए कायदा पारित झाल्यावर सगळ्यात पहिली आणि सर्वात हिंसक निदर्शने आसाम मध्ये सुरू झाली. वातावरण भाजपच्या पूर्णपणे विरोधात गेलं आणि वर्षभरात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप २० चा आकडा पार करणार नाही अशी स्थिती उत्पन्न झाली. विद्यार्थी संघटना आसू चा महासचिव लुरीन ज्योती गोगोई आणि आराजकतावादी अखिल गोगोई यांच्या लाखोंच्या सभा आसामला ढवळुन काढत होत्या. अशा विपरीत स्थितीत हिमंत बिस्व सर्मा अवघ्या ४८ तासात आसामच्या रस्त्यावर उतरून सीएएच्या समर्थनात हजारोंच्या रॅली काढताना दिसु लागले. हा मोठा राजकीय जुगार होता. पण सर्व समाजघटकात प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या हिमंत यांनी अत्यंत धीरगंभीरपणे स्थिती हाताळली आणि आज विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेच्या खेळात पहिल्या स्थानावर आणुन ठेवलंय.
बंगाली हिंदू, असमिया जातीयतवाद आणि हिंदुत्ववाद..
फक्त सहा वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आणि संपूर्ण पूर्वांचलात भाजप आणि हिंदुत्वाचा झेंडा गाडणारी ही व्यक्ती सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आसाममध्ये बुद्धिजीवी आणि सामान्य जनतेवर असमिया जातीयतावादाचा (Assamese Sub Nationalism) मोठा प्रभाव आहे. संघ संबंधित संस्थांचा प्रभाव सतत वाढत असला तरी असमिया जातीयतावाद हाच आजपर्यंत आसामचा राजकीय प्राण होता. त्यात स्थानिक असमिया (खिलंजिया- Khilanjiya) विरुद्ध बहिरागत (Infiltrators) बांगलादेशी हिंदु आणि मुस्लिम यांना असलेला विरोध याने आसामच्या राजकीय, सामाजिक आणि बौद्धिक जगताला आजपर्यंत आकार दिला होता. अशा स्थितीत हिमंत बिस्व सर्मानी बंगाली हिंदूंना भारतीय नागरिकता देणाऱ्या सीएएचं खुलं समर्थन करून अकडेवारीसह हे पटवुन देण्याचा प्रयत्न केला की जर बंगाली हिंदु नसतील तर मध्य आसामच्या कमीत कमी १५ जागांवर असमिया हिंदू कधीही निवडणूक जिंकू शकणार नाहीत. त्यामुळे बंगाली हिंदू असमिया समाजाचे शत्रू नसून ते असमिया हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक आहेत.
आसाम साहित्य सभेची बदललेली दिशा…
वर उल्लेख केल्याप्रमाणे आसाम साहित्य सभा ही असमिया जातीयवादाचा प्रेरणास्रोत होता आणि असमिया हिंदुत्ववादाला तिथे कोणतंही स्थान नव्हतं, परंतु आपल्या राजकीय कौशल्याने सर्मा यांनी साहित्य सभेचे माजी अध्यक्ष परमानंद राजबंशी यांना भाजपकडून सिपाझार मधून निवडणुकीत उतरवलं आहे. याचा सामाजिक आणि राजकीय परिणाम खूप मोठा आहे. आजपर्यंत हिंदुत्ववाद आसामच्या मुख्य सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय प्रवाहात नव्हता तो या घटनेनंतर मुख्य प्रवाहात यायची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हिमंत यांची बांगलादेशी घुसखोरीवरील निःसंदिग्ध भूमिका…
शंकरदेव कलाक्षेत्रात मिया म्युझियम दालन सुरू करण्याचा मुद्दा असो किंवा १९३५ च्या मुस्लिम लीग सरकारने सुरू केलेले सरकारी मदरसे बंद करण्याचा मुद्दा असो सर्मा यांनी स्पष्ट भूमिका घेऊन त्यावर उघडपणे निर्णय घेतल्याने त्यांच्यावर मोठी टीका झाली, परंतु असमिया मुख्य प्रवाहात घुसखोरांना कोणत्याही परिस्थितीत स्थान देण्यात येणार नाही ही बाबही अधोरेखित झाली. मुळ असमिया मुस्लिम आणि घुसखोर मुस्लिम यात आम्ही फरक करणार कारण घुसखोर आक्रमक आहेत, ह्या भूमिकेमुळे समाजात स्वच्छ संदेश गेला.
मदरसा बिल विधानसभेत मांडल्यावर केलेल्या भाषणात सर्मा यांनी म्हटलं, “आम्ही ही बिल मांडु शकलो कारण आम्हाला १०-१२ मुलं निर्माण करणाऱ्या, तीनदा तलाक म्हणून एका निर्दोष बाईला घराबाहेर काढणाऱ्या, उघडपणे इस्लामी राज्य आणू पाहणाऱ्या लोकांची मते मुळीच नकोत, तुम्हाला ती हवी आहेत म्हणून तुम्ही याला विरोध करणं स्वाभाविक आहे. आम्ही वाट बघु आणि वीस वर्षांनी सुशिक्षित झालेल्या मुस्लिमांची मते मिळवू!”
तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करता का?
हा प्रश्न विचारल्यावर सर्मा यांचं उत्तर आहे, “जर दाढी टोपी वाला मौलाना बदरुद्दीन अजमल काँग्रेस सोबत निवडणूक लढवणार असेल आणि परत परत सरकारी मदरसे सुरू करण्याची भाषा करणार असेल तर धार्मिक ध्रुवीकरण होणार आणि ते आम्हीही करणार. आमच्या विकासाच्या मुद्द्याला तुम्ही अजमल द्वारे उत्तर देणार असाल तर आम्हीही तेच करणार” आधीच दुबळ्या झालेल्या काँग्रेसने अजमल सोबत युती करून जो संदेश असमिया जनतेला दिला त्यामुळे काँग्रेस एका नव्या गर्तेत गेली आहे. आजी सीएए मुळे अडचणीत आलेल्या भाजपला यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे.
निवडणूक संचालन आणि अभूतपूर्व लोकप्रियता यांचा अदभूत संगम….
हिमंत बिस्व सर्मा हे आज घडीला भाजपमध्ये निवडणूक संचालनात अमित शहांच्या खालोखाल मानले जातात. प्रशासकीय कौशल्य, अफाट कार्यक्षमता आणि जनमानसाचा खोल अभ्यास याच्या बळावर सर्मा यांनी बोडोलँडमध्ये भाजपला एका मजबूत स्थितीत नेऊन आसाम विधानसभेच्या आधी एक बूस्टर डोस दिला. सध्या निवडणूक प्रचार शिगेला पोचलेला असताना यांच्या सभांना होणारी अफाट गर्दी आणि त्यात तल्लीन होऊन नाचणारे सर्मा (सोबतचा व्हिडीओ उदालगुडी सभेतील आहे स्टेजवर नाचणारे सर्मा आहेत) यांनी वर्षानुवर्ष बॉम्बस्फोट, गोळीबार, बहिष्कार यांनी लांच्छन लागलेल्या आसाम निवडणूका एका वेगळ्या सकारात्मक उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत.
भाजपची महाकाय निवडणूक यंत्रणा पुढे कोण चालवणार याचं उत्तर…
ही निवडणूक शेवटची विधानसभा निवडणूक असेल अशी घोषणा हिमंत बिस्व सर्मा यांनी गेल्या वर्षीच केल्याने भाजपची महाकाय निवडणूक यंत्रणा पुढे कोण चालवणार याचं उत्तर कदाचित मिळालं असावं असं वाटतं!
सध्याच्या त्रिकोणी लढाईत सर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप आघाडी एकुण १२६ पैकी ६५ ते ८० जागा जिंकेल असा अंदाज आहे, पण निकाल काहीही लागले तरी हिमंत बिस्व सर्मा यांच्या रूपाने एका असमिया हिंदुत्ववादी लोकनेत्याचा उदय हे या निवडणुकीचे मुख्य फलित आहे….
(विनय जोशी हे आपल्या महाराष्ट्रातील. अकरा भाषांवर प्रभूत्व असणाऱ्या विनय जोशींनी २००१ ते २००८ ही नऊ वर्षे मेघालयातील गारो हिल्स परिसरात समाजेसेवेसाठी समर्पित केलीत. वर्तमान राजकीय, संरक्षणविषयक विषयांवर समकालिन संदर्भात भाष्य करण्यासाठी ते ओळखले जातात.)