मुक्तपीठ टीम
आपल्या नावातच वेगळेपण असलेला आणि पिळदार भक्कम शरिरयष्टी सोबत आकर्षक पेहराव परिधान करून इंडस्ट्रीचं लक्ष वेधण्यात यशस्वी होत असलेला युवा अभिनेता म्हणजेच रोहित परशुराम! ‘पिंग पॉंग एंटरटेन्मेन्ट’ची बहुचर्चित हिंदी वेबसिरीज ‘हिडन’ मध्ये एक जबरदस्त व्यक्तिरेखा साकारत आहे. अभिनेता संतोष जुवेकर यांची एसीपी प्रदीप राजे ही प्रमुख भूमिका आहे. त्यांच्या सोबत रोहितने राजेंच्या विश्वासू सहकाऱ्याची इन्स्पेक्टर ‘गजरे’ची भूमिका केली आहे. रोहितने या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्याने या व्यक्तिरेखेसाठी तब्बल ७ किलो वजन वाढवून हा ‘गजरे’चा बेरकीपणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हिडन’ १६ जुलैला ‘पिंग पॉंग’ ओटीटी वर रुजू होत आहे, त्यानिमित्ताने रोहित सोबतचा हा संवाद..
प्रश्न : रोहित तुझं ‘रोहित परशुराम’ हे खरं नाव आहे? कि फिल्म इंडस्ट्रीत लावलं जातं तसं आहे?
रोहित : नाही मी माझं नावं कुणाच्या सांगण्याने, प्रभावाने बदललेलं नाही. माझं आणि वडिलांचं मिळून ‘रोहित परशुराम’ असं केलं आहे. मात्र त्यासाठी अंक शास्त्राची थोडी मदत घेतली आहे एव्हढंच खरं आहे.
प्रश्न : अभिनयाच्या क्षेत्रात तुझी एंट्री कशी झाली ?
रोहित : एकदम ऍक्सीडेन्टली मी या क्षेत्रात आलो आहे. मी नॅशनल लेव्हलचा बॉडी बिल्डर आहे. २०१७ सालची राष्ट्रीयस्तरावरील ‘बॉडी बिल्ड’ स्पर्धा खेळलो आहे. या स्पर्धेद्वारे मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१८ साली जिममध्ये माझ्या मित्राचा दिग्दर्शक मित्र चित्रपटातील निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी रांगडा लूक असलेला चेहरा शोधात असल्याचे सांगितले. मी माझ्या ओळखीत कोणी असेल तर कळवितो असे म्हणालो, मात्र मित्राने सांगितले दुसरा कोणी नको तूच चल ऑडिशनला. मी नाटकात अभिनय केला असला तरी माझं ध्येय राष्ट्रीय बॉडी बिल्डर होण्याचं असल्याचं सांगूनही त्याने खूप आग्रह धरला आणि मी ऑडिशनला गेलो. मात्र त्या ऑडिशनमध्ये मी रिजेक्ट झालो. आणि रिजेक्ट होण्याचं कारण माझी बॉडी होती. दिग्दर्शकाने सांगितले की फिल्म इंडस्ट्रीत इतकी बल्की बॉडी चालत नाही. ही ऑडिशन दिल्यावर मला या क्षेत्राविषयी आकर्षण वाटू लागलं. मला चित्रपटात काम करायचं झालं तर आपलं शरीर कमी करायला हवं हे मनात पक्कं झालं आणि तीन महिन्यात मी १६ किलो वजन कमी केलं. याच चित्रपटासाठी तीन महिन्यानंतर ऑडिशन दिली आणि मी सिलेक्ट झालो तो चित्रपट होता मिथुन आणि निर्माते होते जीवन बबनराव जाधव.
प्रश्न : अभिनयाच्या क्षेत्रात तुझा कोणी गुरु आहे काय ?
रोहित : हो, मी विक्रम गोखले सरांचा विद्यार्थी आहे. त्यांनी केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी विशेष आहेत.
प्रश्न : भूमिका निवडताना आणि ती साकारताना तू काय काळजी घेतोस ?
रोहित : एक्टिंग म्हणजे एक थॉट प्रोसेस असते. भूमिका किती लांबीची आहे त्यापेक्षा ती किती महत्वाची आहे हे मी पाहतो. व्यत्क्तिरेखा ऐकल्यानंतर मी तिच्या अंतरंगात घुसून ती माझ्यात पुरेपूर भिनवून घेतो. तिचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर आपसूकच त्या व्यक्तिरेखेत नैसर्गिक रंग भरले जातात.
प्रश्न : हिडन मधला गजरे नेमका कसा आहे?
रोहित : अत्यंत बेरकी. मी केलेल्या इतर व्यक्तिरेखांपेक्षा अत्यंत वेगळा आहे. तो वांद्रे पोलीस ठाण्यात इन्स्पेक्टर आहे. ८ / १० वर्षांची त्याची सर्व्हिस आहे. त्यामुळे साहजिकच थोडं पोक्त आहे. बल्कीपणा आणण्यासाठी मी माझं वजन ६ – ७ किलोने वाढवलं आहे. एसीपी राजेंच्या टीममध्ये हा एक मनमौजी अतरंगी इन्स्पेक्टर म्हणता येईल. दिग्दर्शक विशाल सावंत सरांनी मला ही व्यक्तिरेखा करण्यासाठी बरंच फ्रिडम दिल्याने या व्यक्तिरेखेचे विविध पैलू शोधात आले. चॅनेल कडून चेतन डिके सरांचेही सतत मार्गदर्शन मिळत असते आमच्या बऱ्याचदा चर्चा होत असतात. त्यातूनही काही गोष्टी सापडतात.
प्रश्न : चित्रपट, मालिका क्षेत्रातील तुझा इतर अनुभव कसा आहे?
रोहित : अत्यंत वेगळा. विक्रम गोखले सरांच्या समृद्ध अभिनयाचे बाळकडू सोबत माझी वाचनाची आवड यामुळे मला करायला मिळणाऱ्या व्यक्तिरेखा समजून घेण्यास मदत होते. मिथुन चित्रपटातील प्रमुख निगेटिव्ह व्यक्तिरेखेनंतर चांगलं काम मिळविण्यासाठी थोडा स्ट्रगल केला. मात्र लगेच मला स्वस्तिक प्रॉडक्शन्सच्या हिंदी ‘राम सिया के लवकुश’ व देवी आदि पराशक्ती या हिंदी मालिकांमध्ये लीड निगेटिव्ह कॅरेक्टर रोल करण्याची संधी मिळाली. ‘मिथुन’, ‘रघु ३०५’, या मराठी चित्रपटांमध्ये प्रमुख खलनायक रंगविता आला. तसेच वडील आणि मुलाच्या नात्यावरील आगळ्यावेगळ्या ‘आर बा’ या चित्रपटात नायकाची व्यक्तिरेखा करतोय. तसेच अनेक छान छान वेबसिरीज करता आल्या. ‘हिडन’ गजरेमुळे वेगळी ओळख तयार करण्याचा प्रयत्न केलाय, ट्रेलर पाहून भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.