मुक्तपीठ टीम
परमबीर सिंह यांची मुंबईचे पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलात सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. नगराळे सध्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा कारभार सांभाळत होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याने हेमंत नगराळे यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेमंत नगराळेंचा करिअर प्रवास
- हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत.
- चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी इयत्ता सहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
- त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले.
- नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केलं आहे.
- १९८७ च्या बॅचचे हेमंत नगराळे आयपीस अधिकारी आहेत.
- नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून दिल्लीतही सेवा बजावली आहे.
- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती.
- १९९२ ते १९९४ या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते.
- १९९२ च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. त्याबद्दल त्यांची प्रशंसा करण्यात आली होती.
- रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना १९९४ ते १९९६ या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं होतं.
- १९९६ ते १९९८ मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.
- लहान मुलांचे अपहरण व हत्या करणाऱ्या कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही नगराळे यांनी केली.
सीबीआयच्या सेवेत असताना महत्त्वाची भूमिका बजावली
- १९९८ ते २००२ या काळात सीबीआयसाठी मुंबई व दिल्लीतही सेवा बजावली.
- बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा,
- माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा,
- हर्षद मेहताचा घोटाळा
- तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत त्यांनी बारकाईनं केलेल्या तपासाचं कौतुक झालं होतं.
बँक ऑफ बडोदा दरोडा प्रकरण
- २०१६ मध्ये हेमंत नगराळे यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता.
- बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अवघ्या दोन दिवसांत छडा लावला होता.
- पॉप गायक जस्टिन बिबरच्या कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्था उत्तम राखल्याबद्दलही सरकारनं त्यांचं कौतुक केलं होतं. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करणारे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.
राजकारण्यांविरोधातील कारवाईमुळे संकटही!
- नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना २०१८ साली नगराळे यांच्यावर राजकारण्यांविरोधातील कारवाईमुळे संकट आले होते.
- रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश नगराळे यांनी दिला होता.
- त्या प्रकरणात नगराळे यांच्यासह पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्याविरोधात कारवाईचा प्रयत्न झाला होता. पुढे ते प्रकरण टिकले नाही.
पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान
- राष्ट्रपती पोलीस पदक
- विशेष सेवा पदक
- आंतरिक सुरक्षा पदकानं गौरवण्यात आलं आहे.