मुक्तपीठ टीम
भाजपाने अखेर बर्याच दिवसांच्या विचारमंथनानंतर हिमंत बिस्व सर्मा यांचीच आसामचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखींकडे राजीनामा सादर केल्यानं सर्मांचा मार्ग मोकळा झाला आहे. आसाम भाजपा विधिमंडळ पक्षाने त्यांची नेते म्हणून निवड केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील बैठकीपासूनच हिमंत बिस्व सर्माकडे आसामची जबाबदारी सोपविली जाण्याची चर्चा होती. तर मावळते मुख्यमंत्री सोनोवाल यांना पुन्हा दिल्लीला बोलावण्याची शक्यता आहे.
आसाममध्ये नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीवरून निकालानंतर भाजप नेतृत्व संभ्रमात सापडलं होतं. अखेर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार हिमंत बिस्व सर्मा यांना बोलावून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी ही बैठक सुमारे तीन तास चालली. तेथे गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोषही उपस्थित होते. त्यानंतर हा निर्णय झाला.
या निवडणुकीत भाजपाप्रणित आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमताने विजय मिळविला. राज्यातल्या १२६ विधानसभा जागांपैकी भाजपाने ७५ जागा जिंकल्या आहेत.
कोण आहेत हेमंत बिस्व सर्मा? जाणून घेण्यासाठी खालील लिंक क्लिक करा आणि राजकीय अभ्यासक विनय जोशींनी निवडणूक प्रचार काळात लिहिलेला लेख नक्की वाचा: