मुक्तपीठ टीम
लहान मुलांसोबत मोटर सायकलवरुन प्रवास करताय? तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. लहान मुलांच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ मध्ये सुधारणा करण्यात आली असून आता ही सुधारणा मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ च्या संदर्भात आहे. या कलमानूसार आता मोटरसायकलस्वाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याच्या मागे बसलेल्या ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलांनी त्यांच्या डोक्याच्या साईजचे क्रॅश हेल्मेट घालावे. एवढेच नाही तर चार वर्षापर्यंतचे मूल मोटारसायकलवर बसत असताना, मोटरसायकलची वेगमर्यादाही ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावी. या नियमांचे उल्लंघन केल्यास या नियमांचं उल्लंघन केल्यास पोलीस दंडही आकारु शकतात.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विविध रस्ते सुरक्षा संघटनांच्या सूचनांवरून मोटार वाहन कायद्यातील हा दुरुस्तीचा मसुदा स्वीकारत या संदर्भातील दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रोड सेफ्टी ऑर्गनायझेशनचे डेप्युटी हेड एसके शर्मा सांगतात की, ही तरतूद मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.
मोटारसायकलचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा
- याशिवाय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानेही दुचाकीवरील मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन एक प्रस्ताव तयार केला आहे.
- या अंतर्गत जर चार वर्षांपर्यंतचा मुलगा मोटारसायकलवर मागे बसला असेल तर मोटारसायकलचा वेग ताशी ४० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा.
- प्रस्तावात असे म्हटले आहे की ९ महिने ते ४ वर्षे वयोगटातील मुलाने मागे बसल्यास क्रॅश हेल्मेट घालणे आवश्यक आहे.
- एवढेच नाही तर चार वर्षांखालील मुलाला मोटारसायकलच्या चालकाशी जोडण्यासाठी सुरक्षा हार्नेस वापरावा लागेल.
- सेफ्टी हार्नेसच्या मदतीने मुलाचे वरचे धड ड्रायव्हरला सुरक्षितपणे जोडले जाईल.
कसं असावं हेल्मेट?
- सेफ्टी हार्नेसबाबत, असे म्हटले आहे की, ते हेल्मेट बीआयएसच्या सर्व नियमांनुसार असावे.
- वजनाने हलके आणि अॅडजस्टेबल असायला हवे.
- ते वॉटरप्रूफ आणि टिकाऊ देखील असायलाच हवे.
- संरक्षक उपकरणे हेवी नायलॉन किंवा मल्टीफिलामेंट नायलॉनपासून बनवलेली असावीत ज्यामध्ये मजबूत फोम असेल.
- सुरक्षा उपकरण इतकं मजबूत असावं की, ३० किलोपर्यंतचं वजन सहज सहन करु शकेल.