मुक्तपीठ टीम
मुंबईसह कोकणात तर पावसाने जोर धरला आहे. रात्रभर रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण गुहागर या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार बसरणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. शिवाय, प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत देखील कमालीची वाढ झाली आहे.
बुधवारी जोरदार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री ,सोनवी, मुच्कुंडी, बावनदी या महत्त्वाच्या नद्या ओसंडून वाहत आहेत. चिपळूणमध्ये रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे बाजार पेठेधल्या सखल भागात पाणी साचलं होतं. सकाळी पावसाचा जोर ओसरल्यानंतर याठिकाणी पुराचा धोका टळला आहे.
राजापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अर्जुना नदीला पूर आला आहे. राजापूर शहरांमधल्या जवाहर चौकात सध्या पाणी साचलं आहे. राजापूर बाजारपेठेमध्ये पुराचं पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे नंतर पावसाचा जोर ओसरला पाहायला मिळतोय. जोरदार पावसाने रत्नगिरी-मुंबई गोवा महामार्गावरील घाटात दरड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात नंतर मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.