मुक्तपीठ टीम
पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडे देखील एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांना सज्ज ठेवावे व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या ७ तुकड्या तैनात
राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, रायगड- १, ठाणे – १, सांगली – १ एकूण ५ पथके तैनात आहेत.
तर नांदेड – १, गडचिरोली – १ अशा एकूण दोन ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) २ तुकड्या तैनात केल्या आहेत.
राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती
राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३६८ गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ३०७ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर ५७८९ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५४० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.