मुक्तपीठ टीम
राज्यातील विविध भागात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुंबईमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग या कोकणपट्टीसाठी साठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
मुंबईमध्ये रात्रभर अनेक भागांमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळेच सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दादर, हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. परळच्या ब्रिज पर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे.मुंबई मनपाकडून पाण्याचे पंप सुरू करण्यात आलेले आहेत. मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत असून त्यामुळे लोकल ट्रेनवर त्याचा परिणाम झाला आहे. कल्याण ते कर्जत धावणाऱ्या आणि हार्बर लाईनच्या लोकल गाड्या या २० ते २५ मिनीटे उशीरा धावतील असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबईच्या मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीशेजारील भागातून नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे. या स्थलांतरित नागरिकांना मनपाच्या शाळेत तात्पुरता आसरा देण्यात आलेला आहे.
मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांत पावसाने विश्रांती घेतली असूनही वाहतुककोंडीमुळे मुंबईकरांचा खोळंबा होत आहे. मुंबई काही भागात पाणी साचलेलं असून अंधेरी सबवे परिसरात मॅनहोल ऑपन होतं. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.