मुक्तपीठ टीम
हवामान खात्याचे अंदाज या पावसाळ्यात अचूक येत आहेत. मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. विजांचा कडकडाटासह पाऊस पडत आहे. अधून मधून थोडीशी उसंत घेत सुरु असलेल्या पावसाचा जोर आणखी जास्त वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढताच राहणार असून गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस
• मुंबई आणि परिसरातील उपनगरांमध्ये आज सकाळ झाली ती विजांच्या कडकडाटानेच.
• या परिसरात पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.
• जोरदार पावसाच्या संततधारेमुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मात्र, आज जास्त पाणी साचत नसल्याचे आढळून येत आहे.
• जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.
• त्यामुळे ज्यांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन मनपाने केले आहे.
ठाण्यात सतर्कतेचा इशारा
• सलग दोन ते तीन दिवस ठाण्यातही पाऊस सुरु आहे.
• आज सकाळपासून ठाणे परिसरातही पाऊस सुरु आहे,
• वंदना टॉकिजच्या परिसरात पाणी साचले आहे.
• नवी मुंबईतही जोरदार पाऊस आहे, काही ठिकाणी थोडे पाणी साचले आहे.
• ठाणे जिल्ह्यासाठीही मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा
• हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढगफुटीचा इशारा दिला आहे.
• सिंधुदुर्गात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसणण्याचा अंदाज आहे.
• सिंधुदुर्ग परिसरात राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच NDRF पथके तैनात करण्यात आली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातही जोर वाढणार
• पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
• पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.