मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना आता शोधक पत्रकारांप्रमाणे शोध घेत पुराव्यांसह गौप्यस्फोट करण्याचे कौशल्य दाखवता येणार नाही. मलिकांना एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या नातेवाईकांविरोधात आरोप करता येणार नाहीत. उच्च न्यायालयाने वानखेडे कुटुंबावर आता वक्तव्य-आरोप करण्यावर मलिकांवर बंदी घातली आहे. समीर वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
उच्च न्यायालयानं काय बजावलं?
- समीर वानखेडेंचे वडिल ज्ञानेश्वर वानखेडे यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे.
- आपल्या दाव्यात नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीच्या प्रकऱणात कारवाईची मागणी करतानाच आरोप करण्यापासून त्यांना रोखण्याची मागणी न्यायालयाकडे कऱण्यात आली होती.
- याआधी न्यायालयाने अशी बंदी घालण्यास नकार दिला होता.
- गुरुवारी नवाब मलिकांनी केलेल्या समीर वानखेडेंच्या आईच्या मृत्यू दाखल्यातील दोन धर्मांच्या उल्लेखावर बोट ठेवले.
- त्यानंतर न्यायालयीन सुनावणीत मलिकांवर वानखेडेंविरोधात वक्तव्य करण्यावर बंदी आली.
- पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई मुंबई उच्च न्यायालयानं बजावलं आहे.
मलिकांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला
- एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात मलिकांनी आघाडी उघडली आहे.
- वानखेडेंवर जात-धर्म आणि अन्य मुद्द्यांवर फसवणुकीचा आरोप करत त्यांनी पुराव्यासह हल्ला चढवला आहे.
- समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता.
- या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत सव्वा कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
- प्रसारमाध्यमं, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.