मुक्तपीठ टीम
राज्याच्या राजकारणासाठी शनिवारची सायंकाळ हादरवून टाकणारी ठरली. सचिन वाझे प्रकरण गाजत असतानाच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांनी सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोप फेटाळून लावत राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी शंका उपस्थित केली आहे.
‘परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आहेत. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी केलेला हा केविलवाण प्रयत्न आहे. अन्वय नाईक आणि टीआरपी घोटाळा प्रकरणात भाजपा त्यांच्यावर नाराज होता. त्यानंतर आता सचिन वाझे प्रकरणातून सिंग यांना वाचवण्यासाठीच हे कारस्थान सुरु आहे. देवेंद्र फडणवीस आधी दिल्लीत जाऊन बसले होते. तेथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर सिंग यांनी हे पत्र दिलं म्हणून माझा संशय बळावला आहे. परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न होतोय. हे भाजपाचं कटकारस्थान आहे. ही ‘सोची समझी चाल’ आहे. यात चौकशी झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये. भाजपा सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहे,” असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.