तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट
वेळ नाही. नाही आता नको. मला वेळ कुठे आहे. नाही लसीमुळे नपुंसकता येते. त्या लसीत काय असतं माहित आहे का? थांबा हो थोडं इतरांवर काय परिणाम होतो ते पाहू द्या…एक ना अनेक. बहाण्यांची यादी लांबलचक. लसीकरणासाठीची रांग संपते, पण बहाणे नाहीत. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील एक सक्षमाची माहिती मिळाली. त्याला दोन्ही हात नाहीत. तरीही त्याने लस घेतली. प्रश्न पडला असेल तुम्हाला दोन्ही हात नाहीत, तरी मग लस कशी घेतली? अहो, त्यामुळेच तर त्याला कोणत्याही धडधाकटापेक्षा सक्षम म्हटले आहे. सक्षमच नाही तर अस्सल सक्षम!
हात नाही तर काय झालं?
दोन हात नसूनही अस्सल सक्षम असणारा गुलशन लोहार हा आपल्या देशाच्या उत्तर भारतातील झारखंडचा. खरंतर त्याला दोन्ही हात नाहीत. त्यामुळे तथाकथित फक्त शरीराने सक्षम असलेले अनेक जसे वेगवेगळे बहाणे सांगत लस घेणे टाळतात, तसे गुलशनलाही करता आले असते. पण त्याने तसे केले नाही. दोन हात नाहीत हे कारण पुरसे होते. तो लस घेणार तरी कुठे, असंही वरवर विचार करणाऱ्याला वाटू शकलं असतं. झालंही काहीसं तसं. गुलशन जेव्हा लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहचला तेव्हा लसीकरण पथकाला प्रश्न पडला लस द्यायची कुठे? पण गुलशनने स्वत:च मार्ग दाखवला. त्याने मांडीवर लस देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याला लस देण्यात आली. स्वाभाविकच त्याचे छायाचित्र लस घेण्याच्या जिद्दीचे प्रतिक म्हणून समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून जो संदेश समाजाला मिळणार नाही तो लसीकरणाचा संदेश दोन्ही हात नसलेल्या गुलशनच्या मांडीवरील लसीकरणातून मिळत आहे. शरीरानं सक्षम असूनही लसीकरण टाळणाऱ्यांचे डोळे उघडणारा असा हा संदेश आहे.
गुलशन लोहार अस्सल सक्षम का?
गुलशन लोहारवर लिहावं. सरळस्पष्ट मांडावं, असं वाटलं त्याचं कारण आहे. सध्या आपल्या सभोताली अनेक असतात, जे लसीकरण टाळण्याचा सल्ला देतात. अगदी आपल्यासारख्यांनाही. बहाणे देणारे तर भेटतातच भेटतात. त्यामुळे गुलशनसारख्यांवर भरभरून बोलावं. लिहावं. ते स्वाभाविकच.
तसेच केवळ लस घेतली म्हणून गुलशनचं कौतुक नाही. त्याच्याबद्दल प्रथम आलं ते २०१७मध्ये. २०१७च्या २९ ऑक्टोबरला गुलशन लोहारबद्दल केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ट्विट केले होते. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियांतर्गत दिशा योजनेतून गुलशन लोहार कॉंप्युटर वापरायला शिकला. दोन्ही हात नसूनही. तो सरकारी केंद्रावर गेला. तेथे त्याने प्रयत्नपूर्वक पायाने काँप्युटर कसा ऑपरेट करायचा ते शिकून घेतले. तुम्ही आठवा. यातीलही बहाणेबाजी. या कीबोर्डच्या की हार्ड आहेत, त्यामुळे माझा वेग कमी झालाय. लॅपटॉप दहा इंची आहे ना त्यामुळे तेवढा वेग मिळत नाही. एक ना अनेक बहाने तुमच्या-माझ्यासारखे सक्षम देत असतात. त्यावेळी जेव्हा गुलशनसारखे सक्षम दिव्यांग पायानं कॉंप्युटर चालवतात, तेव्हा त्यांना सलामच केला पाहिजे.
गुलशन लोहारला लसीकरणाचा ब्रँड अँबेसिडर करा!
राजकीय नेते, मग ते गल्ली ते दिल्ली कुठचेही असो. कुठल्याही पक्षाचे असो. प्रत्येक ठिकाणी झळकू पाहतात. शौचालयापासून विद्यालयापर्यंत, स्मशानापासून मैदानापर्यंत सगळीकडे आपलं नाव असलंच पाहिजे असा अट्टाहास असतो. आमच्या भागातील एक आमदार अमित साटम यांनी एका नगरसेवकानं साकारलेल्या उद्यानाच्या मुख्य कुंपणात दुसरं कुंपण उभारलं आणि त्यावर आपलं नाव झळकवलं. कुठेतरी असलंच पाहिजे नाव. भले ते लोकांच्या मनात असो नसो. अशा परिस्थितीत लसीकरणाविषयी अद्यापि गैरसमज असणाऱ्या आपल्या देशात लसीकरणाच्या प्रचार प्रसारासाठी गुलशन लोहारलाच ब्रँड अँबेसिडर केले पाहिजे. हात नसलेला गुलशन जेव्हा पायावर लस घेतो. तेव्हा माझे जसे हात सलाम करण्यासाठी उंचावतात, तसेच धडधाकट असणाऱ्यांचे पाय लसीकरण केंद्राकडे वळतील, एवढं नक्की!
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठचे संपादक आहेत. संपर्क 9833794961 ट्विटर @TulsidasBhoite)
हेही वाचा: पुण्यात घाशिराम कोतवालशाही! माणुसकी आंबिल ओढ्यात वाहिली! राजकारणी बिल्डरचे गुलाम!
पुण्यात घाशिराम कोतवालशाही! माणुसकी आंबिल ओढ्यात वाहिली! राजकारणी बिल्डरचे गुलाम!