मुक्तपीठ टीम
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील कामांच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक. नव्याने १०१ गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार; सौरऊर्जेचा होणार वापर. मोठ्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी एक्सप्रेस फिडर बसवण्यासाठी १० कोटींचा निधी. परळी शहर व लगतच्या गावांना २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी टोकवाडी येथे जलकुंभ उभारणार, ५ कोटींचा निधी प्रस्तावित. ५ व ७.५ एच पीच्या पंपांची जागा सोलर पंप घेणार; यासाठी ५० कोटींचा निधी
बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून सुमारे १३६७ गावांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या योजनेची कामे हाती घेण्यात आली असून, 1078 गावांतील योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातील ज्या कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण झाला आहे, त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे तत्काळ सुरू करुन निर्धारित वेळेत पूर्ण करावेत; असे निर्देश आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले.
बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधून सुरू व प्रस्तावित कामांचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून ही बैठक झाली. दोनच दिवसांपूर्वी बीड येथे जलजीवन मिशन मधील कामांचा धनंजय मुंडे यांनी बीड येथे आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडून आवश्यक सहकार्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करण्याबाबत सूचित केले होते.
बैठकीस मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, एम जी पी चे मुख्य अभियंता यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम वेगाने सुरू असून, ज्या गावांमध्ये अद्याप कोणत्याही योजनेतून पाणी पुरवठा नाही, अशा सुमारे १०१ गावांमध्ये सौर ऊर्जेसह पाणी पुरवठा योजना नव्याने मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बीड जिल्ह्यातील ५०-६० मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या एक्सप्रेस फिडर साठी आवश्यक असलेले १० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी विभागाला दिले आहेत.
परळी शहर व आजूबाजूला लागून असलेल्या गावांना एकत्रित पाणी पुरवठा करून २४ तास पाणी उपलब्ध तरुण देण्यासाठी टोकवाडी येथे जलकुंभ उभारणीस ५ कोटी रुपये व अन्य आवश्यक कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजुरी साठी सादर करावा, असेही निर्देश मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर मंत्री श्री. पाटील यांनी दिले.
काही गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी ५ एच पी व ७.५ एचपी चे पंप बसवलेले आहेत; या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे सोलार पंप जोडणी करून विजेची बचत केली जावी, असे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सुचवले होते. ५ व ७.५ एच पी च्या सोलार पंपांची मागणी दुरुस्ती करून डीपीआर करावेत व प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.
बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावोगाव-घरोघर पाणी पुरवठ्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेस आवश्यक सर्व सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्री धनंजय मुंडे यांनी पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील तसेच विभागाचे बीड जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानले.