मुक्तपीठ टीम
सध्या कोल्हापुरात राजश्री शाहू महाराज कृतज्ञता पर्व सोहळा सुरु आहे. त्या कार्यक्रमांतर्गत “गुजरी सुवर्ण जत्रा “आयोजित करण्यात आली. या जत्रेत कोल्हापुरी पारंपारिक दागदागिन्यांचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली. कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशनने ही सुवर्ण जत्रा आयोजित करण्यात विशेष वाटा उचलला.
छत्रपती शाहू महाराजांनी गूजरी वसवली त्या पार्श्वभूमीवर गुजरी येथेच ही सुवर्ण जत्रा आयोजित करणे समर्पकत होते. यामध्ये सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेपर्यंत दुकाने सुरू असतील. यामध्ये पारंपारिक साज, बुगडी, राणीहार ,चिताक, शिंदेशाही तोडे अशा दागिन्यांच्या बरोबरच देश-विदेशातील सोने-चांदी खरेदी ग्राहकांसाठी पर्वणी ठरली. काही दुकानात १० ते ३० टक्क्यांपर्यंत भरघोस सूट देण्यात आली.
कोल्हापूरची सुवर्ण कला जगमान्य – श्रीमंत शाहू छत्रपती महाराज
तत्कालीन काळात शाहू महाराजांनी सुवर्णकारांना स्थैर्य दिले. त्याचा परिणाम आज दिसतो आहे. कोल्हापूरची सुवर्ण कला ही जगमान्य झाली असल्याचे प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले.
गुजरी सुवर्ण जत्रा(पारंपरिक दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री) चे उद्घाटन गुजरी येथे त्यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी आमदार जयश्री जाधव जिल्हाधिकारी राहुल रेखावार , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले , या सुवर्ण कलेला उर्जितावस्था आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी यावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न करावेत अशी मागणीही महाराजांनी यावेळी केली. जिल्ह्यातील सुवर्णकारांनी आपल्या कलेद्वारे कोल्हापूरची ओळख भारतभर केली आहे. ती वाढवून आता संपूर्ण जगात करावी अशी अपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली तर गुजरी यात्रेच्या आयोजनामुळे सराफांकडून ग्राहकांना मनपसंत व पारंपारिक दागिने खरेदी करता येतील असे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रास्ताविक कोल्हापूर सराफ व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी केले.
ग्राहकांसाठी या यात्रेत दागिन्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे उपलब्ध होते: कोल्हापुरी साज, मनी मंगळसूत्र, कुशी, वजरती, लमबट माळ, गोलमाळ, नक्षीमनी , पैलू माळ बोरमाळ, शिंदेशाही तोडा, पुतळा, बुगडी, अशा प्रकारचे दागिने होते.