मुक्तपीठ टीम
निवृत्ती तोंडावर असतानाच गुजरातचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हे दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी विराजमान झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. १८ ऑगस्ट २०२० रोजी राकेश अस्थाना यांची ‘बीएसएफ’च्या महासंचालकपदी डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती झाली होती. येत्या ३१ जुलै रोजी राकेश अस्थाना त्या पदावरून निवृत्त होणार होते. परंतु निवृत्तीच्या ३ दिवसाआधी राकेश अस्थानी यांची दिल्ली पोलीस आयुक्तपदी निवड झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आल्यापासून दिल्लीत वाढलेल्या गुजरात कॅडर प्रभावाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
याआधीही गुजरात कॅडरमधीलच १९८४बॅचचे वाय.सी.मोदी हे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजेंसी म्हणजेच एनआयएचे प्रमुख नेमण्यात आले आहे. याशिवाय आता पर्यंत इतरही अनेक गुजरात कॅडरमधील आयआरएस, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना दिल्लीत अथवा केंद्रीय यंत्रणांमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
अरविंदकुमार शर्मा हे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी होते. २००१ ते २०१३पर्यंत ते गुजरातेत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना वेगवेगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत होते. त्यानंतर मोदी पंतप्रधान म्हणून दिल्लीत येताच तेही दिल्लीत आले. त्यांची नियुक्ती पंतप्रधान कार्यालयात झाली. त्यानंतर त्यांच्या २०२२मधील निवृत्तीपूर्वी एक वर्ष आधीच त्यांनी सेवेचा राजीनामा दिला आणि ते थेट भाजपात सामील झाले.
१९८६च्या बँचचे गुजरात कॅडरचे अधिकारी पी.डी.वाघेला यांना २०२०मध्ये ट्रायच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. ते मोदींच्या विश्वासातील मानले जातात. त्यांनी जीएसटीची जबाबदारी सांभाळली होती.
२०२०च्या सुरुवातीला गुजरात कॅडरचे अधिकारी जी.सी.मुर्मू यांना कॅगच्या प्रमुखपदी नियुक्त केले. मोदी सरकारची दुसरी टर्म संपल्यानंतरही एक वर्ष म्हणजे २०२५पर्यंत त्या पदावर असतील. मनमोहन सिंह यांच्या सत्ताकाळात सरकारविरोधात कॅगच्या अहवालानेच आरडीएक्स स्फोटकांसारखे विध्वंसक काम केले होते, हे इथं महत्वाचं आहे. अर्थखात्यानंतर ते निवृत्त झाले. त्यांना जम्मू काश्मीर या नव्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल नेमण्यात आले होते. त्यानंतर आता ही खूपच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
गुजरात कॅडरच्या १९८१ बॅचच्या अधिकारी रिता तेवतिया यांना २०१९मध्ये भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण म्हणजे एफएसएसएआयच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.
गुजरात कॅडरचे १९७१ बॅचचे अधिकारी पी.के.मिश्रा गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना त्यांचे प्रधान सचिव होते. ते मोदींसबोत दिल्लीत आले. पहिली पाच वर्षे त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पंतप्रधान कार्यालयात जबाबदारी सांभाळली. त्यानंतर गेल्यावर्षी म्हणजे दुसऱ्या टर्ममध्ये त्यांना प्रधान सचिवपदी नियुक्त करण्यात आले.
गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळातील ज्युनियर इंजिनीअर हार्दिक शाह २०१५ राज्यात आयएएस अधिकार झाले. त्यानंतर मोदींच्या पसंतीस पात्र ठरल्याने त्यांना २०१७मध्ये दिल्लीत प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले. त्यानंतर त्यांना पर्यावरण, माहिती आणि प्रसारणसारख्या महत्वाच्या मंत्र्यांच्या खासगी सचिवपदी नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांना उपसचिव म्हणून पंतप्रधान कार्यालयात आणण्यात आले. सध्या ते पंतप्रधान मोदींचे खासगी सचिव आहेत.
पंतप्रधानांचे अतिविश्वासपात्र म्हणून ओळखले जाणारे आणि सावलीसारखेच त्यांच्या सोबत वावरणारे संजय भावसार यांना मोदींनी गुजरातमधून आपला ओएसडी म्हणून दिल्लीत आणले. २०१६मध्ये त्यांची आयएएसमध्ये पदोन्नती झाली.
हिरेन जोशी, प्रतीक दोशी हे पंतप्रधान मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांच्या टीममध्ये होते. तेही नंतर दिल्लीत आले. पंतप्रधान कार्यालयात त्यांना महत्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यानंतर त्यांना सह सचिवपदी पदोन्नतीही मिळाली.
यासर्व नावांसोबतच भरत लाल, गुरुप्रसाद महापात्र, अनिता करवाल, ए.के.शर्मा, यांचाही गुजरातमधून दिल्लीत आलेल्यांच्या यादीत समावेश आहे.