मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका आहे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले. गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल ,माजी उपनगराध्यक्षा स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
आजच्या पक्षप्रवेशामुळे नवे चेहरे आपल्याला मिळाले आहेत. जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.
कोकणात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी आदरणीय पवारसाहेबांनी अनेक निर्णय घेतले. कोकण रेल्वे होण्यासाठी पवारसाहेबांनी पुढाकार घेतला. साहेबांचे कोकणावर अपार प्रेम आहे. कोकणाचा कुठलाही प्रश्न आला तर कोकणवासियांना सहकार्याची भावना ठेवा अशी पवारसाहेबांची आम्हाला सूचना असते असेही अजित पवार म्हणाले.
कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे चिपळूण , दापोली, गुहागर या पट्ट्यातील अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असते. पुढील आठवड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करु असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
आजच्या पक्षप्रवेशामुळे गुहागर, चिपळूण भागात राष्ट्रवादीची ताकद नक्कीच वाढेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
कुणबी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली होती. अनेक वर्ष कुणबी समाजाचे नेतृत्व करुनही अनेक नेत्यांनी समाजासाठी काहीच केले नव्हते. मात्र साहेबांची भेट घेतल्यानंतर साहेबांनी समाजाला आश्वस्त केले शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुलुंड येथे कुणबी समाजाच्या वसतीगृहासाठी पाच कोटींचा निधी दिल्याचेही खासदार सुनिल तटकरे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे,राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.