मुक्तपीठ टीम
चला, चला पंढरीला |
भेदभाव मिटवाया ||
संताचिया चरणी |
माथा टेकवाया ||
तन्मयतेने शाहीर शीतल साठे गात होती. निमित्त होते सासवड ते जेजुरी या टप्प्यावरील ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ या उपक्रमामध्ये…
महाराष्ट्रातील सामाजिक,परिवर्तनवादी संस्था,संघटना मधील कार्यकर्ते गेली दहा वर्ष पंढरपूरच्या वारीत एक दिवस तरी वारी अनुभवावी असे म्हणत महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, पत्रकार, संपादक, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते यांना साद घालीत या वारीत ते एक दिवस चालत असतात. यंदा लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे २६जून २०२२ रोजी सासवड ते जेजुरी या १८ किलोमीटरच्या टप्प्यात माऊलीच्या पालखी सोबत हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या सोबत ही एकदिवसीय वारी सुरू झाली.
सकाळी पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यात फुले यांना अभिवादन करून आणि संविधानातील प्रास्ताविकातील उद्धेशिकाचे वाचन करून संविधान समता दिंडीची सुरुवात करण्यात आली.यावेळी अविनाश पाटील,हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर,शरद कदम,संदीप आखाडे,सचिन माळी,शीतल साठे आदी उपस्थित होते.
हडपसर, दिवेघाट या मार्गाने ही मंडळी सकाळी ८ वाजता सासवड इथे पोहचली सासवडच्या अलीकडे पोलिसांची तपासणी नंतर ट्रॅफिक जाम, बस मधून खाली उतरून काही अंतर पायी चालत असा टप्पा पार करीत सारे सासवड एस. टी.स्थानकावर एकत्र जमले. इतर संस्था, संघटना यांचे कार्यकर्ते इथे एकत्र जमले होते.
पुन्हा एकदा शीतल साठे हिच्या चला, चला पंढरीला या गाण्याने पायी वारीला सुरुवात झाली. एक दिवस तरी वारी अनुभवावीचा यंदाचा चेहरा हा तरुण मुलांचा आणि महिलांचा होता. दरवर्षी तरुण मुलांची आणि महिलांची संख्या वाढते आहे. सासवड ते जेजुरी हे अंतर चालत असताना कार्यकर्ते दिंडीत चालणाऱ्या अनेकांशी बोलत होते,समजून घेत होते.त्यांच्या अभंग मध्ये कोरस देत होते. खांद्यावर पताका नाचवत होते.
दुपारी जेवणानंतर झालेल्या कार्यक्रमात सुभाष वारे, अविनाश पाटील यांनी एक दिवस तरी वारी अनुभवांनी आणि संविधान समता दिंडीच्या आयोजना बाबत माहिती दिली. अड्याळ टेकडी येथे कार्यरत असलेले ग्रामस्वराज्य अभियानाचे सुबोध दादा यांनी त्यांचे विचार मांडले.आणि तुकडोजी महाराजांच्या कामाची माहिती दिली.
हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी वारीचा इतिहास सांगत संत पाप पुण्याच्या कल्पनेकडे कशा पद्धतीने पहात ते सांगितले.तुकोबाराय म्हणतात, राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली.
राम म्हणत पाऊल टाकले तर एका यज्ञाचे फळ मिळते.आज आपण खूप पाऊले चाललो म्हणजे आपल्याला खूप यज्ञाचे पुण्य मिळाले. बरं हे सर्व कशा साठी करायचे तर स्वर्ग मिळविण्यासाठी.संताना स्वर्गाच्या मर्यादाही माहीत आहेत त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,
या तया पुण्याची पाऊती सरे सवेची इंद्रपणाची उगी उतरे मग येवू लागती माघारी मृत्यू लोका..
आपल्याला पुण्य मिळाले ,त्या बळावर स्वर्गात गेलो आणि पुण्याचा बँक बॅलन्स संपला तर परत माघारी यावे लागते.म्हणून यात काही अर्थ नाही.आपण वारीत चाललो ते पुण्य मिळविण्यासाठी नाही तर केवळ आनंद मिळविण्यासाठी.
तुकोबाराया म्हणतात, गात जागा,गात जागा प्रेम मागा विठ्ठला असे गात जायचे कशासाठी,वारीत चालायचे कशा साठी तर प्रेम मागण्यासाठी म्हणून आपण एक दिवस वारीत चाललो आहे असे बंडगर महाराज यांनी सांगितले.
कली युगी संत जाहले अनंत परी पटाईत पाच जण संत परंपरेत पाच प्रमुख संत आहेत.ज्ञानोबाराया ,नामदेवराया , कबीर,एकनाथ महाराज आणि तुकोबाराय. या पाच संता मध्ये कबीराचे, वारकरी संप्रदायात फार मोठे महत्त्व आहे.पूर्वी काशी हून कबीरांची पालखी पंढरपूरला यायची त्यांच्या पालखीत पांढरे निशाण असायचे असे ही त्यांनी सांगितले.
हभप श्याम सुंदर महाराज सोन्नर यांनी एक दिवस वारीची कल्पना विषद करताना संत विचार आणि संविधान एकमेकाशी कसे परस्पर पूरक आहेत ते संताच्या अभंगाचा दाखला देत सांगितले. स्वातंत्र्य,समता,बंधुता,सामाजिक न्याय या मूल्याची त्यांनी संत विचाराशी घट्ट वीण असल्याचे उदाहरणासह सांगितले. महिलांना ५० टक्के आरक्षण आता सुरू झाले आहे पण सातशे वर्षापूर्वी वारकरी संप्रदायात संत जनाबाई,सोयराबाई,कान्होपात्रा आदी स्त्री संताचा वावर बरोबरीने होत असे.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मुख्य प्रवाह आहे तर वारी हा महाराष्ट्राचा सार्वजनिक उत्सव आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचा मूल्यविचार वारकरी संतांनी त्यांच्या अभंगातून मांडला. तोच विचार वारीच्या माध्यमातून सेलिब्रेट करायला हवा या भावनेनं ‘संविधान समता दिंडी’ संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून पंढरपूरला पोचणार आहे. काल महात्मा फुले वाड्यातून या दिंडीला सुरवात झाली.
दिंडीत संविधानिक मूल्यविचारांना पूरक असे संतांचे अभंग, संविधानाविषयीचे अभंग आणि गाणी गात अनेकजण पंढरपूर पर्यंत चालणार आहेत. आता ही संविधान समता दिंडी संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातून १० जुलैपर्यंत पंढरपूरला पोचणार आहे. संविधानप्रेमी आणि परिवर्तनवादी समविचारी नागरिकांनी शक्य तिथे या दिंडीत सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद घेत संविधानाच्या प्रबोधन मोहिमेत सहभागी व्हावं. असे आवाहन हभप श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी यावेळी केले.
वारीत सहभागी मान्यवर
मुंबईहून राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम,हर्षदा भालेकर,मनोज खराडे,यांच्या सोबत जनता दलाचे रवि भिलाणे, अनिसचे विजय परब, मालवणच्या नाथ पै सेवांगणाचे नितीन वाळके, बने परिवाराचे महेश बने, सामाजिक कार्यकर्ता सावित्री मुंढे, उद्योजक अजय कदम, प्रदीप मयेकर, अतुल साटम, मिलिंद यादव, किशोर लाड, गणेश क्षीरसागर, पुण्याहून राष्ट्र सेवा दलाचे दत्ता पाकिरे, प्रकाश कदम, शिवराज सूर्यवंशी,विनोद बाफना,उद्योजक सुनील अंबिके,गांधी विचारांचा प्रसारक संकेत मुनोत,अनिसचे विशाल विमल,संविधान अभ्यासक सुभाष वारे,सातारा हून लेक लाडकी अभियानाची ॲड. वर्षा देशपांडे, प्रा.संजीव बोंडे,शॉर्ट फिल्म च्या क्षेत्रातील कैलास जाधव, माया पवार, रूपा मुळे,स्वाती बल्लाळ,सुमन पवार,जयश्री खुळे,सिंधुताई लोहार,अनिस चे अध्यक्ष अविनाश पाटील,बीड हून आलेले मनोहर जायभाये ,राष्ट्र सेवा दलाचे मिरज हून आलेले सदाशिव मगदूम,संगमनेर हून आलेले राजाभाऊ अवसक,चांगल्या आरोग्य सुविधा सर्वांना मिळाव्यात म्हणून काम करणारे पत्रकार दीपक जाधव, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे सुनील स्वामी,राजवैभव शोभा रामचंद्र,रेश्मा खाडे,शीतल यशोधरा,शर्मिला जोशी,सौरभ बगाडे,आम्रपाली जाधव,सतीश घावटेमर्दान, कल्याणहून आलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र डुंबरे,सेवा दलाचे बाजीराव खुळे, सिध्दी राऊत,’ ‘डियर तुकोबा’ या पुस्तकाचे लेखक विनायक होगाडे, नवयान जलशाचे सचिन माळी,शीतल साठे आणि त्यांची टीम, संदीप आखाडे सोबत आलेली संविधान प्रचारकाची टीम,सासवडचे योगेश धोंडे,श्रीकांत लक्ष्मी शंकर,कविता जगताप,सायली कामथे,सूरज गदादे,लातूरहून आलेले हनुमंत मुंढे,आनंदवन हून आलेल्या सारिका सौसागडे,तुकडोजी महाराज यांचे अड्याळ टेकडी येथे कार्यरत ‘ग्राम स्वराज्य ‘अभियानाचे सुबोध दादा,एस.एम जोशी फाउंडेशनचे उपेंद्र टण्णू आदी सह असंख्य कार्यकर्ते या वारीत सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचा समारोप लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करणारे गीत शीतल साठे यांनी सादर केले.
राबणारा म्हणतो माझा
श्रमणारा म्हणतो माझा
बहुजन म्हणतो माझा
मुसलमान म्हणतो माझा
दलित म्हणतो माझा
माता माऊली म्हणते माझा
अहो,
भटका म्हणतो माझा
आदिवासी म्हणतो माझा
असा होवून गेला राजा..
कोल्हापूरचा राजा..
कोल्हापूरचा शाहू महाराजा…
जना जनाच्या मना मनाचा
घेतला त्यानं ठाव
मिटवून टाकला भेदभाव
अन् बदलून टाकल नाव
आभार श्रीकांत लक्ष्मी शंकर यांनी केले. संविधान समता दिंडी रात्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाली.