मुक्तपीठ टीम
लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लोकल ते ग्लोबल भन्नाट ऑफर सुरु झाल्या आहेत. आपल्या देशात लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना मस्त चविष्ठ बिर्याणीत सवलत तर अनेकांना प्रोत्साहित करण्यांना मोफत देण्याची ऑफर आहे. तर अमेरिकेत मोफत बिअर देण्याची ऑफर आहे. सर्वात भन्नाट ऑफर हाँगकाँगमध्ये आहे. तिथे काही कोटी रुपयांचा फ्लॅट लॉटरीच्या माध्यमातून मिळवण्याची संधी मिळणार आहे.
दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरातील अक्रम बिर्याणी शॉप या वेळी चवीपेक्षा कोरोना लसीसाठी चर्चेत आहे. बिर्याणी विक्रेत्याने लसीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. जर एखादी व्यक्ती आपल्याकडे दुकानात लसीचे प्रमाणपत्र घेऊन जात असेल तर त्याला सूट दिली जात आहे. जर एखादा सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक एका दिवसात ३० लोकांना लस देत असेल तर, त्याला मोफत बिर्याणी खायला मिळेल. दुकानदाराच्या या उपक्रमाचे सीलमपूरचे एसडीएम अजय अरोरा यांनी कौतुक केले आहे. असे म्हटले आहे की, अशा ऑफर्स लोकांना लस घेण्यास प्रेरित करतील आणि हेच सरकारचे उद्दीष्ट आहे. यामुळे लोक येत्या काळात ही लस घेण्यास उत्सुक होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
हाँगकाँगमध्ये लसीकरणासाठी लॉटरीद्वारे अपार्टमेंट्स देण्यात येत आहेत. हाँगकाँगमध्ये कोरोनाची लस घेणार्या लोकांना बक्षीस म्हणून १४ लाख डॉलर्सचे अपार्टमेंट देणार आहेत. कारण इथले बरेच लोक लस घेण्यास उत्सुक नाहीत. सिनो ग्रुपचे एनजी टेंग फोंग चॅरिटेबल फाऊंडेशन आणि चायनीज इस्टेट होल्डिंग्ज लिमिटेड क्वान टोंग क्षेत्रात त्यांच्या ग्रँड सेंट्रल प्रकल्पात नवीन अपार्टमेंट्स देत आहेत. या लसीचे दोन्ही डोस घेणारे हाँगकाँगचे रहिवासी ४४९ चौरस फूट अपार्टमेंटच्या लॉटरीसाठी पात्र असणार आहेत. सिनो ग्रुप हाँगकाँगमध्ये लिस्टेड डेव्हलपर सिनो लँड कॉर्पोरेशनची मूळ कंपनी आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या एरी काउंटी शहरामध्ये तरुणांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी १८ ते २१ वयोगटातील लोकांना बिअरची ऑफर आहे. एरी काउंटीचे आरोग्य आयुक्त डॉ. बर्नस्टीन म्हणाले की, “काउंटीचे एक्झिक्युटीव्ह मार्क पोलोनकार्झ यांनी ही कल्पना सुचवली. २० ते ३० वर्षे वयोगटातील लोकांचा लसीकरणात सहभाग कमी आहे. परंतु संसर्गित लोकांमध्ये या गटातील लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांना लस घेण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी आम्ही तरुणांना ही ऑफर दिली आहे.”