मुक्तपीठ टीम
तासगाव हे द्राक्षासाठी प्रसिद्ध मानलं जात. या तासगाव तालुक्यातील वडगाव येथील विजय शंकर देसाई या द्राक्ष उत्पादकाने साडेसहा सेंटीमीटर लांबीचा द्राक्षमणी असलेल्या वाणाचे संशोधन केले आहे. केळ्याएवढ्या आकाराच्या या फळाला ग्राहकांचीही पसंती मिळत असून अन्य जातीपेक्षा या जातीच्या द्राक्षामध्ये रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा जास्त असल्याचेही आढळून आले आहे.
द्राक्ष उत्पादक देसाई यांनी ४ एकर शेतीवर आठ वर्षांपूर्वी त्यांनी ‘सुपर सोनाका’ जातीची द्राक्षबाग उभी केली. या बागेतील एका झाडावर त्यांना वेगळ्या पद्धतीचे द्राक्षघड दिसले. त्यांनी त्या झाडाच्या काड्या काढून त्याची अन्यत्र दोन एकरवर स्वतंत्र लागवड केली. गेली आठ वर्षे विविध प्रयोग करून त्यांनी ही बाग वाढवली. गेल्या वर्षी पहिल्यांदा या द्राक्षवेलींना फळे लागली आणि हे द्राक्षमणी देखील तब्बल साडेसहा सेंटीमीटर लांबीच्या मण्यांचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशी एवढ्या मोठ्या आकाराची द्राक्षे यापूर्वी कुठेही तयार झालेली नव्हती किंवा कुणी पाहिलीही नव्हती. यामुळे या द्राक्षांबद्दल सर्वांनाच आकर्षण वाटू लागले.
अन्य जातीपेक्षा या जातीच्या द्राक्षामध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असल्याचेही आढळून आले आहे. तसेच या मोठी पाने व मण्यांची लांबी विक्रमी साडे सहा सेमी लांब इतकी आहे. जिल्ह्यातील द्राक्षबागायतदारांमध्ये या द्राक्षच्या नवीन वाणाची चर्चा आहे. या द्राक्षना दर देखील चांगला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या लांबट आकाराच्या द्राक्षाला देशांतर्गतच नाहीतर आता विदेशातूनही मागणी येऊ लागली आहे. याशिवाय नवीन जातींच्या वाणाचे पेटंट मिळवण्याचा देखील देसाई प्रयत्न करत आहेत.
तासगावची द्राक्षे न्यारी
• ४ किलोचे ४५१ रुपये
• ही नवी द्राक्षे यंदा विदेशातही पाठविण्यात आली आहेत.
• बोटाएवढे द्राक्ष मणी, आकर्षक रंग, जिभेवर रेंगाळणारी चव यामुळे या द्राक्षाला चांगली मागणी येत आहे.
• मागील वर्षी चार किलोस ५०१ रुपये दराने या द्राक्षाची खरेदी झाली.
• तर यंदा द्राक्षाची एकूण आवक जास्त असतानाही अद्याप नाव न ठरलेल्या या द्राक्षाच्या ४ किलोच्या पेटीस ४५१ रुपये दर मिळाला आहे.
पाहा व्हिडीओ: