मुक्तपीठ टीम
पुस्तक समीक्षक आरशाचे काम करतात. पुस्तक परीक्षणामुळे वाचकांची संख्या वाढते तसेच लेखकाला देखील लिखाणांतील त्रुटी दिसून येते. परीक्षणाअभावी चांगली पुस्तके देखील दुर्लक्षित राहतात. त्यामुळे साहित्य प्रचार – प्रसारामध्ये पुस्तक समीक्षकांचे काम महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागातील वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय लिखित ‘कथा साहित्य का पुनर्पाठ‘ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते नुकतेच राजभवन मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
अकॅडेमिस्तान, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आयोजित प्रकाशन सोहळ्याला समाज सेविका सुमिता सुमन सिंह, अकॅडेमिस्तानचे संस्थापक दीपक मुकादम, वीरेंद्र याज्ञिक व ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मराठी, हिंदी, बंगालीयांसह भारतीय भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस साहित्य कृती निर्माण झाल्या आहेत. मराठी वृत्तपत्रे पुस्तक साहित्य परीक्षणाला विशेष महत्व देतात. अनेक महिला समीक्षक देखील मराठी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणे लिहिताना दिसतात. त्या तुलनेत हिंदी वृत्तपत्रांमध्ये पुस्तक परीक्षणे कमी असतात असे मत नोंदवताना परीक्षणामुळे वाचकांमध्ये पुस्तक वाचनाची इच्छा जागृत होते असे राज्यपालांनी सांगितले. नुकताच गीतांजली श्री यांच्या ‘रेत समाधी‘ या कादंबरीला साहित्य जगतातील प्रतिष्ठेचे बुकर पारितोषिक मिळाले हा सर्व भारतीय भाषांचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी सांगितले. .
भारतात शास्त्रीय तसेच साहित्यिक समीक्षा – मीमांसेची एक मोठी परंपरा आहे. समीक्षक व टीकाकारांमुळेच साहित्य कृतींकडे वाचक व समाजाचे लक्ष जाते. समीक्षक लेखकाच्या साहित्यातील सारगर्भित अर्थ दर्शवतो, असे सांगताना ‘कथा साहित्य का पुनर्पाठ‘ नेमके हेच कार्य करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
भारतात उच्च कोटीचे साहित्य निर्माण होते. परंतु त्याची आंतर राष्ट्रीय पातळीवर समीक्षा होत नाही. भारतीय भाषांमधील पुस्तकांचा वेळेवर इंग्रजी भाषेत अनुवाद झाला तर आपल्या अनेक साहित्य कृतींना नोबेल पारितोषिक मिळेल असे मत लेखक डॉ. करुणाशंकर उपाध्याय यांनी व्यक्त केले.
देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना लिहिलेल्या या पुस्तकात सन १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर सुरु झालेल्या हिंदी पुनर्जागरणापासून समकालीन लेखक व कादंबरीकार यांच्या लिखाणाचे विश्लेषण करण्यात आले आहे, असे उपाध्याय यांनी सांगितले.