मुक्तपीठ टीम
देशात या पूर्वी प्लेग, मलेरिया, कॉलरा यांसारखी संकटे येऊन गेली. परंतु कोरोना संकट काळात समाजासाठी निःस्वार्थ सेवा करण्याची, परोपकाराची व कृतज्ञतेची सामुहिक भावना प्रथमच पहावयास मिळाली, असे उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्था व सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी खासदार गोपाल शेट्टी, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, पार्श्वगायक उदित नारायण, ब्रह्मकुमारी योगिनी दीदी यांसह १७ कोरोना योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, धार्मिक प्रवृत्तीचे लोक ईश्वर आराधनेतून जो आनंद प्राप्त करतात तोच आनंद जनसामान्य लोक सेवेच्या माध्यमातून प्राप्त करू शकतात असे सांगून कोरोना काळात अनेक सेवाभावी संस्थांनी चांगले कार्य केले आहे.
कार्यक्रमाला मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्थेचे रुद्रप्रताप बिस्वास, सह्याद्री फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष डॉ दिलीपकुमार इंगवले प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते डॉ.उल्का नायर, अनिशा सुर्यवंशी, डॉ.योगेश दुबे, शेख रिहाज बशीर, डॉ.राजकुमार गवाळे, संतोष कुमार देशमुख, डॉ.संदीप तांबरे, डॉ.अनंत मुळे, अशोक सावंत, विश्वासराव काटमांडे, व अनिता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.