मुक्तपीठ टीम
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी अकरा वेळा आमदार झालेले, अभ्यासू, संयमी आणि ‘जनसामान्यातील माणूस’ म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय नेत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात असून जनसामान्यातील लोकनेता हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य विधानमंडळाचे सर्वाधिक काळ राहिलेले शेकापचे सदस्य गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
“राज्य विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आदर्श लोकप्रतिनिधी असलेल्या देशमुख यांनी शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांप्रती आपली बांधिलकी शेवटपर्यंत जपली. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. शांत, संयमी तरीही लढवय्ये असलेले गणपतराव देशमुख अजातशत्रू होते. त्यांच्या निधनाने राज्य विधानमंडळाने एक चालते बोलते विद्यापीठ गमावले आहे”, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.
साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.
गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले : देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे.
त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते.
इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.