मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या जागतिक संकटानंतर आता वातावरण आणि पशूंमधून पसरणाऱ्या जीवाणू, विषाणू, परजीवींच्या संकटाची भारत सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने (डीबीटी) बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनवर लक्ष ठेवण्यासाठी ‘वन हेल्थ’ कन्सोर्टियम सुरू केले आहे. देशात पशुंद्वारे होणारे रोग तसेच इतर घातक जीवाणू, विषाणू आणि परजीवींपासून होणारा संसर्ग यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘वन हेल्थ’ दक्ष असेल.
नव्या किंवा संभाव्य रोगांच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी विद्यमान निदान चाचण्यांचा वापर आणि अतिरिक्त पद्धती विकसित करण्यावरही हा प्रकल्प लक्ष केंद्रित करेल. बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव डॉ रेणू स्वरूप यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डीबीटीचा पहिला ‘वन हेल्थ’ प्रकल्प सुरू केला.
वन हेल्थ कॉन्सोर्टियम ही मोहीम आहे तरी काय?
- डॉ रेणू स्वरूप म्हणाल्या की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगभरातील संसर्गजन्य रोग विशेषत: प्राण्यांपासून होणारे रोग रोखण्याच्या बाबतीत ‘वन हेल्थ’चे प्राधान्य असेल.
- भविष्यात साथीच्या आजारांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी मानव, प्राणी आणि वन्यजीवांचे आरोग्य समजून घेण्यासाठी त्यांनी यावर भर दिला.
- वन हेल्थ कॉन्सोर्टियममध्ये हैदराबाद स्थित डीबीटी-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल बायोटेक्नॉलॉजीच्या नेतृत्वाखाली २७ संस्था आहेत.
- कोरोनानंतरच्या काळात सरकारने सुरू केलेली ही सर्वात मोठी आरोग्य मोहीम आहे.
वन हेल्थच्या मोहिमेत कोण असणार?
- एम्स-दिल्ली
- एम्स-जोधपूर
- आयव्हीआरआय-बरेली
- गडवासु-लुधियाना
- तनुवास-चेन्नई
- एमएएफएसयू-नागपूर
- आसाम कृषी आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ
- आयसीएआर
- आयसीएमआर केंद्र
- अनेक वन्यजीव संस्थांचा समावेश आहे.