मुक्तपीठ टीम
गुगलने भारतातील मुस्लिम समाजातील शिक्षिका आणि स्त्रीवादी समाज सुधारक कार्यकर्त्या फातिमा शेख यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त एक खास डूडल बनवले आहे. फातिमा शेख या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या. त्यांनी मुस्लिम महिलांसाठी खूप काम केले आहे. फातिमा शेख यांनी १८४८ मध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत कार्य केले.
फातिमा शेख यांचा जन्म १८३१ साली पुण्यात झाला.
- त्या त्यांचा भाऊ उस्मानसोबत राहत होत्या.
- अनुसूचित जातीतील लोकांना शिक्षण दिल्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या भावाला समाजातून हाकलून देण्यात आले.
यानंतर दोन्ही भाऊ-बहीण सावित्रीबाई फुलेंना भेटले आणि त्यांच्यासोबत दलित आणि मुस्लिम महिला आणि मुलांना शिकवू लागले.
फातिमा शेख घरोघरी जाऊन दलित आणि मुस्लिम महिलांना स्वदेशी ग्रंथालयात अभ्यासाचे आमंत्रण देत होत्या. फातिमा यांना समाजातील प्रस्थापित वर्गाकडून कडवट विरोधाचा सामना करावा लागला. असे असतानाही फातिमा शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज सुधारणेची चळवळ सुरूच ठेवली. भारत सरकारने २०१४ मधील फातिमा शेख यांच्या कामगिरीचे स्मरण केले आणि इतर प्रमुख शिक्षकांसह उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्यावर धडा सहभागी केला. त्यामुळे नव्या पिढीला त्यांच्याविषयी प्रेरणादायी माहिती मिळू लागली.
गुगलने भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जीवनाला डुडलांजली वाहिल्याने आता जगभरात त्यांच्याविषयी प्रेरक माहिती पोहचली आहे.