मुक्तपीठ टीम
देशातील सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेशात पुन्हा सत्ताप्राप्तीचा इतिहास घडवतानाच गोवा या लहान राज्यातही भाजपा सत्ता टिकवताना दिसत आहे. भाजपाला सध्या १९ जागांवरील आघाडीसह सर्वात मोठा पक्ष झालेला आहे. स्पष्ट बहुमतापासून भाजपा फक्त २ जागा दूर आहे.
गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,मा. अमितभाई शाह,राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
सी.टी. रविजी,केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डीजी,दर्शना जरदोशजी यांचेही अभिनंदन आणि आभार! pic.twitter.com/2kn6ggc3SG— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 10, 2022
गोव्याचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर हयात असताना भाजपाने २०१७च्या निवडणुकीत भाजपा क्र.२ चा पक्ष ठरला होता. पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी त्यावेळी तातडीने हालचाली करून आमदार जमवले आणि भाजपाच्या सत्तेची मोट बांधली होती. याही वेळी गोव्यातील भाजपासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेतेच तारणहार ठरले आहेच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केंद्रीय नेतृत्वाने गोव्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या रणनीतीच्या बळावर प्रमोद सावंत यांच्यासारखं तुलनेनं कमी प्रभावी भासणारं नेतृत्व असतानाही भाजपाला विजय मिळवता आलं आहे. तेही २०१७पेक्षा जास्त जागांसह, हे विशेष मानलं जात आहे.
चांगली टक्कर दिलेली काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे तर मगोप ३ जागांवर आघाडीवर आहे. अरविंद केजरीवालांच्या आपने २ जागांवर विजय मिळवला आहे. तर गोवा फॉरवर्ड पार्टी १, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ३, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी १ आणि अपक्ष ३ जागी आघाडीवर आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या सहकार्यानं भाजपाची सत्ता गोव्यात येणं सहज शक्य मानले जात आहे.
एकीकडे दिल्लीतील अरविंद केजरीवालांची आम आदमी पार्टी दूरच्या गोव्यात २ जागा मिळवत असताना शेजारच्या महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साधं खातंही उघडता आलेलं नाही.
गोव्याचा कौल
एकूण जागा ४०
आघाडी जाहीर ३९ जागा
- भाजपा १९
- काँग्रेस ११
- महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी ०३
- अपक्ष ०३
- आप ०२
- रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ०१
पर्रिकरांच्या मुलाला पराभवाचा धक्का!
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पणजी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सरात विजयी झाले. त्यामुळे अपक्ष मैदानात उतरलेल्या उत्पल पर्रिकरांना पराभवाचा झटका बसला. त्यांना शिवसेनेने पाठिंबा देत निवडणुकीत मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला होता.
प्रमोद सावंतामुळे भाजपामागे बहुजन?
गोव्यात देवेंद्र फडणवीस यांनी पर्रिकरांच्या मुलाला महत्व दिले नाही, ती चूक केली असं मानलं जात होतं. मात्र, एक सुप्त जातीचा फॅक्टर भाजपाने ओळखूनच तसं केलं असंही मानलं जातं. गोव्याच्या राजकारणात त्यातही भाजपाच्या सातत्यानं सारस्वत मंडळी जास्त प्रभावी राहिली. प्रमोद सावंतांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांनी चतुराईनं काहींची मक्तेदारी मोडत नवी मांडणी केली. इतर सर्व जाती भाजपाशी जोडल्या गेल्या. त्यांचं तळागाळातील कामही भाजपासाठी फायद्याचं ठरलं.