मुक्तपीठ टीम
अभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूनंतर बॉलिवूड आणि ड्रग्स कनेक्शन प्रकाशात येण्यास सुरुवात झाली. या प्रकरणी आतापर्यंत अनेक कलाकारांची नावे समोर आली असून त्यात आता टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस ७ चा उपविजेता एझाझ खानची भर पडली आहे. त्याला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीने अटक करुन मुंबईच्या एनडीपीएस न्यायालयासमोर हजर केले होते. एनसीबीने एझाझ खानबाबत अनेक गुप्त माहिती समोर आणली आहे. एनसीबीने याआधी जेरबंद केलेला शादाब बटाटा हा एझाझला ड्रग सप्लाय करणारा बिग बॉस आहे असे उघड झाले आहे.
३ एप्रिलपर्यंत कोठडी वाढवली
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात ड्रग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शादाब बटाटा आणि एझाझ खान यांच्यात व्यावहारिक संबंध आढळून आले आहेत. एनसीबीला या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. त्यामुळे ब्यूरोने एझाझची ३ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, जी न्यायालयाने मान्य करत ३ एप्रिलपर्यंत त्याला एनसीबी कोठडी सुनावली आहे.
ड्रगचे ग्लॅमर कनेक्शन
• एझाझ खानला नारकोटिक्स ब्युरोने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले होते. एनसीबीच्या चौकशीत असे समोर आले की, शादाब तोच व्यक्ती आहे, जो एजाजला ड्रग्स पुरवायचा.
• एझाझ हे ड्रग्स बॉलिवूडशी संबंधित लोकांना द्यायचा.
• एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एझाझचे अनेक ग्राहक टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित होते.
• त्यांच्यापर्यंत ड्रग्स पोहचवण्यासाठी एझाझ व्हॉइस नोटचा वापर करायचा.
• ऑर्डर मिळताच रेकॉर्डिंग डिलीट करायचा.
• ड्रग्सबाबत बोलताना हा सीरियल आणि चित्रपटांच्या नावावरुन बनलेल्या कोडमधून बोलायचा.
याआधीही केली होती अटक
याआधीही एझाझ खानला २०१८मध्ये बंदी घातलेली औषधे घेण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या नारकोटिक्स सेलने अटक केली होती. त्यावेळी नवी मुंबई पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाइल फोनही जप्त केले होते.